रस्त्यात कुत्रा आडवा आल्यामुळे दुचाकी अपघातग्रस्त होऊन दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. नांदूरनाका ते जत्रा हॉटेल रस्त्यावर हा अपघात झाला. दिव्यांश्री घुमरे (दोन वर्ष) असे मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे. कोणार्कनगर येथील प्रज्ञा सोसायटीत वास्तव्यास असणारी दिव्यांश्री आई दिपालीसोबत दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. नांदुर नाका ते जत्रा हॉटेल मार्गावरील बांम्बूज हॉटेलसमोर कुत्रा आडवा आल्याने आईला अकस्मात दुचाकीचा ब्रेक दाबावा लागला. पण वाहन नियंत्रित झाले नाही.
आई व चिमुकली दुचाकीवरून पडल्याचे सांगितले जाते. दिव्यांश्रीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच मामा ज्ञानेश्वर तागटे यांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे डॉ. दीपाली तातर यांनी घोषित केले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.