नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव-नाशिक-गोंदे या टप्प्यातील सहापदरी मार्गावरील वाहनधारकांचा प्रवास आता महागणार आहे. टोलच्या सध्याच्या दरात मोटार, जीपसाठी ४.४४ टक्के तर, बस आणि मालमोटारीसाठी सव्वा तीन टक्के इतकी वाढ झाली आहे. एक एप्रिलपासून हे नवीन दर लागू होत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पिंपळगाव टोल प्लाझावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांसाठी नवीन दर जाहीर केले आहेत. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे-नाशिक-पिंपळगाव या टप्प्यात ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना पिंपळगाव नाक्यावर टोल भरावा लागतो. मुंबई, नाशिकहून पुढे मालेगाव, धुळे आणि परराज्यात जाणारा आणि परराज्यातून मुंबईकडे येणारा हा महामार्ग आहे. त्यावर परराज्यासह उत्तर महाराष्ट्रातील वाहनांची मोठी वर्दळ असते. वाढीव टोलचा भार आता सर्व वाहनधारकांवर पडणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या माहितीनुसार सध्या केवळ पिंपळगाव टोल नाक्यावरील दरात वाढ करण्यात आली. याच महामार्गावरील घोटीस्थित टोलच्या दरात कुठलीही वाढ झाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव टोल नाक्यावर सध्या मोटार, जीप, व्हॅनसाठी (एका बाजूचा प्रवास) २२५ रुपये लागतात. एक एप्रिलपासून त्यामध्ये १० रुपयांनी वाढ होऊन आता २३५ रुपये मोजावे लागतील. मिनी बस, तत्सम वाहनांसाठी सध्या एका बाजूच्या प्रवासासाठी ३६५ रुपये टोल लागतो. तो आता ३८० रुपये होईल. मालमोटार आणि बससाठी एका बाजूच्या प्रवासाकरिता ७७० रुपयांऐवजी ७९५ रुपये घेतले जातील. तीन ॲक्सल वाणिज्य वाहनांसाठी सध्याचा ८४० रुपये ( नवीन दर ८७०), हलके वाणिज्य वाहन व अवजड वाहन (चार ते सहा ॲक्सल) वाहने – १२०५ (१२५० रुपये) आणि सात वा त्यापेक्षा अधिक ॲक्सलच्या अजस्त्र कंटेनरसाठी १४७० (नवीन १५२० रुपये) असे दर असणार आहेत.

परतीच्या प्रवासाचे दर

एकाच दिवसात पिंपळगाव टोल नाक्यातून परतीचा प्रवास करणाऱ्या वाहनांना वेगळे दर आकारले जातात. त्यानुसार मोटार, जीप, व्हॅन व हलक्या वाहनांना ये-जा (२४ तासात परतीचा प्रवास) करण्यासाठी एकत्रित ३५५ रुपये, मिनीबस, एलसीव्ही आणि एनजीव्ही (५७० रुपये), बस आणि मालमोटार (१३०५ रुपये), तीन ॲक्सल वाणिज्य वाहन (१३०५ रुपये), हलके वाणिज्य वाहन व अवजड वाहन (चार ते सहा ॲक्सल) वाहने (१८७५) आणि सात व त्यापेक्षा अधिक ॲग्सलच्या अजस्त्र कंटेनरसाठी (२२८५ रुपये) असे शुल्क आकारले जाणार आहे.