नाशिक – साधारणत: साडेचार महिन्यांपूर्वी विकलेल्या टोमॅटोचे साडेतीन ते चार कोटी रुपये देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या कार्यालयास टाळे ठोकून टोमॅटोचे लिलाव बंद पाडले. जोपर्यंत पेसे मिळत नाहीत, तोपर्यंत लिलाव सुरू होऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने बाजार समितीचे कामकाज प्रभावित झाले.

राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार दिलीप बनकर हे पिंपळगाव बाजार समितीचे सभापती आहेत. नियमानुसार समितीत माल विकल्यानंतर शेतकऱ्याला २४ तासात पैसे मिळायला हवेत. मात्र साडेचार महिने होऊनही टोमॅटोचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. टोमॅटोसाठी पिंपळगाव ही जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाची बाजार समिती मानली जाते. आसपासच्या भागातील शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी आणतात. परवानाधारक कंपनी, आडतदाराने कोट्यवधी रुपये थकवूनही बाजार समिती जबाबदारी घेण्यास तयार नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयास टाळे ठोकले. टोमॅटो लिलाव बंद पाडले. पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत लिलाव सुरू होऊ दिले जाणार नसल्याचा इशारा दिल्यामुळे बाजार समिती व्यवस्थापनाची तारांबळ उडाली.

बाजार समिती शेतकऱ्यांच्या आडतीवर चालते. समिती हमी देणार नसेल तर, आम्ही कुठे दाद मागायची, असा प्रश्न आंदोलकांनी केला. महिला शेतकरीही आंदोलनात सहभागी झाली. टोमॅटोचे पैसे न मिळाल्याने मुलाच्या लग्नात अडचणी आल्या. सभापतींशी संपर्क साधूनही त्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला. या संदर्भात बाजार समितीचे सभापती आमदार बनकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते उपलब्ध झाले नाहीत.

समितीने ठेवीतून रक्कम देण्याचा आग्रह

नियमानुसार शेतकऱ्यांचे पैसे वेळेत देणे, ही बाजार समितीची जबाबदारी आहे. समितीच्या बँकेत ठेवी आहेत. यातून शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाकावे आणि बाजार समितीने ही रक्कम संबंधित आडतदारांकडून वसूल करावी, असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला. बाजार समितीकडे पाहून आम्ही माल दिला आहे. त्यामुळे थकीत रकमेला बाजार समिती जबाबदार असल्याकडे त्यांंनी लक्ष वेधले.