नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवीसह गडाची ‘व्हीआर ३६०’ तंत्रज्ञानावर आधारीत ‘आद्यस्वयंभू श्री सप्तश्रृंगी माता’ ही विशेष चित्रफित तयार करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाधारीत या उपक्रमातून भाविकांना मंदिरासह परिसरात प्रत्यक्ष भ्रमंतीची अनुभूती मिळेल. अनोख्या पद्धतीने दर्शन आणि सभोवतालच्या परिसराची विहंगम सहल घडणार आहे.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांच्या मार्गदर्शनातून ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या संकल्पनेतून ‘व्हीआर ३६०’ तंत्रज्ञानावर आधारीत या चित्रफितीची निर्मिती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या चित्रफितीचा अनुभव घेतला. आगामी कुंभमेळ्यात आधुनिक तंत्रज्ञाच्या माध्यमातून जगभरातील भाविकांसाठी ही नाविन्यपूर्ण पर्वणी ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

३६० अंशात त्रि-पाचमितीय तंत्रज्ञानावर आधारीत ही चलचित्रफित साधारणत: साडेतेरा मिनिटांची आहे. संहिता लेखन मुख्य व्यवस्थापक दहातोंडे यांचे असून संगमनेर येथील कंपनीची निर्मिती आहे. या उपक्रमातून आधुनिक तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड दिली जाणार आहे. गडावर अनेक दुर्गम भाग असून तिथे कधीकधी अपघात होतात. या उपक्रमातून संपूर्ण गडाचे भाविकांना जागेवर सुंदर दर्शन घडते. दुर्गम भागात जाणाऱ्यांचे प्रमाण कमी करता येईल, असे ट्रस्टकडून सांगितले जाते. भाविकांना ही चित्रफित पाहण्यासाठी भक्त निवास, शिवालय आणि पहिली पायरी येथे सभागृहात व्ही आर उपकरणासह व्यवस्था केली जाईल. प्रत्येक ठिकाणी एकावेळी ३० भाविक ती बघू शकतील, असे प्राथमिक नियोजन आहे. सप्तश्रृंगी गडावर ॲम्पी थिएटरचा प्रस्ताव यापूर्वीच प्रशासनाला सादर झाला आहे. तो मान्य झाल्यास तिथेही चित्रफितीचे सादरीकरण करता येणार आहे.

विशेष प्रकारातील चित्रफित पाहण्यासाठी ‘व्हीआर’ यंत्रणा लागते. ती पाहताना आपण सप्तश्रृंगी गडावर प्रत्यक्ष भ्रमंती करीत असल्याची अनुभूती मिळते. चित्रफितीतून संपूर्ण गड परिसराच्या अनोख्या भ्रमंतीसह देवीचे दर्शन, आरती, शारदीय नवरात्रौत्सव, गडाचा इतिहास, सभोवतालची मंदिरे व सेवा-सुविधांची माहिती उलगडत जाते.