येथील ट्रॅव्हल एजंट ऑफ नाशिक अर्थात तान संस्थेच्या वतीने २२ ते २४ जानेवारी या कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते तर आ. प्रा. देवयानी फरांदे व महापौर अशोक मुर्तडक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या बाबतची माहिती तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. उत्तर महाराष्ट्रातील पर्यटनप्रेमींना डोळ्यासमोर ठेवून २००७ पासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. पर्यटनप्रेमींना अधिकाधिक पर्याय एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून तान करत आहे.
या माध्यमातून पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांचा परिचय या निमित्ताने केला जातो. गंगापूर रस्त्यावरील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात हे प्रदर्शन होणार आहे. यंदाच्या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ, महिलांचे भिशी ग्रुप, हास्य क्लब यांना प्रदर्शनाला भेट देणे सुकर व्हावे, यासाठी त्यांना आयोजकांतर्फे विनामूल्य वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र, यासाठी किमान आठ ते दहा जणांचा गट असावा आणि प्रथम आयोजकांशी संपर्क साधून दिवस व वेळ ठरविण्यात यावी, असे भालेराव यांनी नमूद केले. तसेच याआधी युरोप, नर्मदा परिक्रमा व कैलास मानसरोवर या सहली पूर्ण केलेल्या नाशिककर पर्यटकांची उपरोक्त सहलीच्या अनुभवावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी ९८६००२८७८४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader