Pahalgam Terror Attack Updates Today : जम्मू काश्मीरच्या पहेलगाममध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील १४ पर्यटक शनिवारी पोहचले होते. तीन दिवस पहेलगाम येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतल्यानंतर सोमवारी सर्वजण श्रीनगरकडे मार्गस्थ झाले. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्यांना पहेलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे समजले. हे ऐकताच सर्वांना धक्का बसला. पहेलगामहून निघण्यास अजून आपण एक दिवस उशीर केला असता तर…केवळ या कल्पनेनेही सर्वजण हादरले. दैव बलवत्तर म्हणून आपण वाचलो, अशीच सर्वांची भावना झाली.

पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला. अनेकजण तिकडे अडकले आहेत. ज्यामध्ये भाजपच्या प्रदेश पदाधिकारी देवयानी ठाकरे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या १४ पर्यटकांचाही समावेश आहे. ठाकरे यांनी जळगावच्या खासदार स्मिता वाघ तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्याविषयी चर्चा केली आहे.

पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेसने चाळीसगावहून निघालेला सात महिला आणि सात पुरूषांचा गट जम्मू येथे उतरून शनिवारी काश्मिरमधील पहेलगाम येथे पोहोचला होता. सर्वांनी त्याठिकाणी निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. सर्वजण तेथून पुढे श्रीनगरकडे मार्गस्थ झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत अनेकांचा जीव घेतला. गोळीबारात अनेकजण जखमीही झाले. सुदैवाने आम्ही आदल्या दिवशी निघून पहेलगामहून पुढील प्रवासाला निघाल्याने बचावलो, असे देवयानी ठाकरे यांनी लोकसत्ताला सांगितले.

श्रीनगरला पोहोचल्यावर एका हॉटेलमध्ये हे सर्वजण मुक्कामी थांबले. तेथून पुढे कटराला गेल्यावर वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन २७ एप्रिल रोजी दिल्लीहून विमानाने मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, तत्पूर्वीच पहेलगाममधील गोळीबाराच्या घटनेनंतर काश्मिरमध्ये सुरक्षितता वाढविण्यात आल्याने त्यांना श्रीनगरमध्येच थांबून राहावे लागले आहे. त्यांचे पुढील प्रवासाचे नियोजन साफ कोलमडले असून, तणावाची स्थिती लक्षात घेता श्रीनगरमध्ये आता जास्त थांबून राहणेही त्यांना आता धोकादायक वाटू लागले आहे. त्यांच्या गटात सर्वच ज्येष्ठ नागरिक असून, सर्वजण भीतीच्या सावटाखाली आहेत.

सर्वांना शक्य तितक्या लवकर घरी जाण्याची ओढ आता लागली आहे. त्यामुळे देवयानी ठाकरे यांनी जळगावच्या खासदार स्मिता वाघ आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधून जळगाव येथे पोहोचण्यासाठी खास विमानाची सोय करण्याची मागणी केली, याशिवाय, जळगावच्या रेखा वाघुळदे, रेणुका भोगे, अनिता चौधरी या काही महिला गोळीबाराच्या दिवशी पहेलगाम येथेच होत्या. त्यांना लष्कराने वेळीच सुरक्षितस्थळी हलविल्याने कोणतीच इजा पोहोचली नाही.

जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधल्यावर जिल्ह्यातील किती पर्यटक तिकडे अडकले आहेत, याची चौकशी करण्यासाठी मंत्रालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क केला जात आहे. दिल्लीतील नियंत्रण कक्षाशी सातत्याने समन्वय ठेवण्यात येत असून अधिकृत माहिती मिळताच ती कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले.