लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये थांबून राहिलेले पर्यटक नाशिकमध्ये परतण्यास सुरुवात झाली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी काश्मीरमध्ये फिरण्याऐवजी हॉटेलमध्ये सुरक्षित थांबण्यास प्राधान्य दिले होते. काहींनी गुलमर्ग व सोनमर्गसह इतरत्र भेट दिली. बहुतेक जण पूर्वनोंदणी केलेल्या विमान तिकीटावर माघारी आले. परतलेल्या काहींनी पुन्हा पर्यटनासाठी काश्मीरमध्ये जाण्याचा मनोदय व्यक्त केला. तर, काहींनी मात्र जाणार नसल्याचे म्हटले आहे.

उन्हाळी सुट्टीत प्रवासी कंपन्या वा वैयक्तिक नियोजन करून अनेक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. पहलगावमधील दहशतवादी हल्यामुळे सर्वांना आपली सहल थांबवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. जिल्ह्यातील प्रवासी कंपन्यामार्फत गेलेले ५० आणि वैयक्तिक नियोजन करून जाणारे २६ असे एकूण ७६ पर्यटक काश्मीरमध्ये सुरक्षितस्थळी थांबले होते. काहींची परतीच्या विमानांची तिकीटे नंतरची होती. त्यांच्या नातेवाईकांनी संबंधितांना लवकर आणण्याचा आग्रह धरला. अशा पर्यटकांची यादी प्रशासनाने सरकारकडे पाठविली होती. परंतु, दोन-तीन दिवसांत त्यांची परतीच्या प्रवासाची नोंदणी असल्याने त्यानुसार हे प्रवासी परतले.

यामध्ये संगणक अभियंता सिद्धी मुसळे आणि सोहम मुसळे या भावंडांचा समावेश आहे. बलविंदर सिंग चौधरी यांच्यासह सात जण रविवारी मुंबईत दाखल झाले. तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील तीन अधिकारी हे कुटुंबातील आठ सदस्यांसह सायंकाळी विमानाने मुंबईकडे निघाले.

दहशतवादी हल्ल्यामुळे काहींना सहल अर्ध्यावर सोडून द्यावी लागली. दहशतवादी हल्ला झाला, त्या दिवशी बलविंदर सिंह चौधरी हे कुटुंबियातील सात जणांसह दुपारी पहलगामला पोहोचले होते. हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांनी दोन दिवस पहलगाममधील हॉटेलमध्ये वास्तव्य केले. कुटुंबियांतील सदस्यांमध्ये तीन मुली होत्या. हल्ल्याच्या घटनेमुळे त्या घाबरल्या होत्या. श्रीनगरहून पहलगामला जाताना मार्गावर फारसे सुरक्षारक्षक दिसले नव्हते. परंतु, परतीच्यावेळी मार्गात सर्वत्र सुरक्षारक्षक होते. परतीच्या प्रवासात आम्ही गुलमर्ग आणि सोनमर्गला भेट दिली. पहलगामला कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यास त्या ठिकाणी कुटुंबियांसह पुन्हा जाण्यास निश्चितपणे आवडेल, असे बलविंदर सिंग चौधरी यांनी सांगितले. अनेकांना जम्मू-काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पूर्णत: अनुभवता आले नाही. त्यामुळे परतणाऱ्या काहींची पुन्हा काश्मीरमध्ये भ्रमंतीसाठी जाण्याची इच्छा आहे. काही पर्यटक मात्र पुन्हा काश्मीर सहलीवर जाण्यास इच्छुक नसल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांमधून उघड झाले.