नगरपालिकेचे व्यवस्थापन कोलमडल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी शहराच्या मुख्य प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शहर व्यापारी महासंघाने केली आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत गटारीवरील दुकानांच्या पायऱ्या तोडण्यात आल्या. निधी आल्यानंतर काम करण्याचे आश्वासन देण्यात आले; परंतु पाच महिने झाले तरी कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे दुकानात येण्याजाण्यासाठी ग्राहकांना त्रास होतो.
काम कधी पूर्ण होईल याची माहिती जनतेला द्यावी. गाळे बांधून दिल्यानंतर त्या गाळ्यांची देखभाल केलेली नाही किंवा गाळेधारकांना होत असलेल्या त्रासाची गंभीरतेने दखल घेतलेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. सावित्रीबाई फुले बाजारपेठेतील गाळ्यांच्या समोर शहरातील घाण असते. सर्व घाण रोज सकाळी गाळेधारक दुकान उघडण्याअगोदर स्वखर्चाने स्वच्छ करतात. सावित्रीबाई फुले भाजी मंडईचे काम चार कोटी रुपये खर्च करूनही पूर्ण झालेले नाही. त्या ठिकाणी रात्री अवैध धंदे सुरू असतात. मंडईचे काम अर्धवट झाल्यामुळे भाजीवाले रस्त्यावर बसत असल्याने रहदारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आठवडे बाजारच्या जागेचे काय नियोजन केले, याचीही माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कालिका माता चौक ते गुरुद्वाराच्या मागील बाजूस बांधलेल्या गाळ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. रसाळ कॉम्प्लेक्स, इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर, आठवडे बाजारातील गाळे, बस स्थानकासमोरील गाळ्यांसमोर अतिक्रमणे तसेच वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने होणारी भांडणे हे नित्याचे झाले आहे. प्रशासनाकडून यावर कोणतीच कार्यवाही होत नाही. शहरात १५ दिवसांच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन असल्याचे सांगितले जात असले तरी पाणीपुरवठा १५ ते २० दिवसांआड केला जातो. यामध्ये काही भागांमध्ये एक किंवा दोन तास पाणी सोडले जाते.
शहरातील काँक्रिटीकरण तसेच डांबरीकरण केलेल्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासला जात नाही. दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासनाने कोणती कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अस्वच्छता, मोकाट जनावरांचा प्रश्न, वाढत्या अतिक्रमणांनी अरुंद होत चाललेले रस्ते या सर्वच समस्या व्यापारी महासंघाने मांडल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या या निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीख, सचिव राजकमल पांडे आदींची स्वाक्षरी आहे.

Story img Loader