संपामुळे अनेक कार्यालयांमधील कामकाज विस्कळीत
कामगार कायद्यात बदल करावा, समान काम-समान वेतन, रिक्त पदे भरावीत आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध संघटनांनी सहभाग नोंदविला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या भव्य मोर्चावेळी मोर्चेकऱ्यांनी अर्धा तास ठिय्या मारून वाहतूक रोखून धरली. घोषणाबाजी आणि हलगी व डफच्या सहाय्याने गीते सादर करण्यात आली. संपात हजारो कर्मचारी सहभागी झाल्यामुळे बँकिंगसह शासकीय कार्यालयातील दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले. रास्ता रोकोमुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक खोळंबली.
या संपात बँक, विमा, टपाल, राज्य परिवहन महामंडळासह निवृत्ती वेतन धारक संघटना, ग्रामसेवक संघटना अन्य काही शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. केंद्र सरकारने केलेल्या विविध कामगार कायद्यातील प्रस्तावीत बदलांना विरोध करण्यासाठी या देशव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटनांचे नेते डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, जगदिप गोडसे, करूणासागर पगारे, सुधाकर गुजराथी, सुनंदा जरांडे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून मोर्चाला सुरूवात झाली. त्यात आयटक व सिटू संलग्न कर्मचारी, बँक, विमा, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण, बांधकाम कामगार, घरकामगार आदी संघटनांच्या हजारो कर्मचारी व कामगार सहभागी झाले. यामुळे मोर्चाला वेगळीच भव्यता प्राप्त झाली. राज्य तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर द्वारसभा घेण्यात आली. समान काम-समान वेतन, अंगणवाडी, शालेय पोषण, आशा, अर्धशिक्षक व अन्य सरकारी योजनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कामगार म्हणून मान्यता मिळावी, राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करा, अनुकंपा भरती करावी, कामगार कायद्यातील कामगार विरोधी तरतुदी काढून टाकाव्यात यासह १२ मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला दिले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांनी अचानक रास्ता रोको सुरू केल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. आधीच बहुतांश कार्यालयांमधील कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने नागरिकांची दैनंदिन कामे विस्कळीत झाली होती. त्यात, या वाहतूक कोंडीची भर पडली. एमजी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, आदी भागात वाहने अर्धा तास खोळंबून राहिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा