नाशिक – द्राक्ष खरेदीत व्यापाऱ्यांनी जिल्ह्यात मागील तीन वर्षात सुमारे १२०० शेतकऱ्यांची ४७ कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी संशयित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने केली.

कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी नाशिक विभाग पोलीस महानिरीक्षक कार्यालयात द्राक्ष उत्पादकांच्या समस्यांबाबत बैठक झाली. यावेळी संघाने व्यापारी आणि निर्यातदारांकडून होणारी फसवणूक ही गंभीर समस्या असल्याकडे लक्ष वेधले. या संदर्भात संघाने शेतकऱ्यांकडून संकलित केलेले तक्रार अर्ज विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात सादर केले. या तक्रारींचा निपटारा करावा, असा आग्रह संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख आणि सचिव बबनराव भालेराव यांनी धरला. द्राक्ष बागाईतदार संघाकडे आतापर्यंत ११२९ शेतकऱ्यांचे ७३८ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. फसवणुकीची एकूण रक्कम ४६ कोटी १७ लाखहून अधिक असून त्यापैकी सर्वाधिक अर्ज मागील वर्षातील असल्याचे विभागीय अध्यक्ष गडाख यांनी सांगितले. काही प्रकरणात गुन्हे दाखल होऊन व्यापाऱ्यांवर कारवाई झाली. तर काही प्रकरणात कारवाई झाली नसल्याचा मुद्दा पदाधिकाऱ्यांनी मांडला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणांत तीन महिन्यांपासून कारवाई सुरू असल्याचा दावा केला. यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >>>मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का

मालमत्ता गोठविण्याची सूचना

शेतकऱ्यांची द्राक्षासह शेतीमाल विक्रीतून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वंकष स्वरूपाचा कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे कृषिमंत्री माणिक काकाटे यांनी सांगितले. फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी. ४६ कोटींच्या वसुलीसाठी संशयित व्यापाऱ्यांच्या मालमत्ता गोठविण्याची कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले.

Story img Loader