नाशिक : लाल कांद्याच्या देशातील विविध भागात वाहतुकीसाठी जिल्ह्यातील लासलगाव, अंकाई आणि निफाड स्थानकांवरून दरमहा नेहमीच्या तुलनेत अधिक रेक लागण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. त्यानुसार नेहमीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे ६० पेक्षा जास्त रेक उपलब्ध करण्याची तयारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दर्शविली आहे.

रेल्वेतून कांदा वाहतूक करण्याच्या विषयावर मुख्य वाणिज्य प्रबंधक अरविंद्र मालखेडे आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या उपस्थितीत कांदा व्यापाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी व्यापाऱ्यांनी नोव्हेंबरच्या मध्यापासून कांदा वाहतूक सुरू करण्याचे मान्य केले. उन्हाळ कांद्याचे भाव अधिक असल्याने सध्या त्याची मोठ्या स्वरुपात वाहतूक केली जात नाही. ऑक्टोबरच्या प्रारंभापासून नवीन लाल कांदा येण्यास सुरुवात होईल. यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने कांद्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा कांदा देशभरात पाठविताना रेल्वे रेकची संख्या अपुरी पडू शकते, याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले.

हे ही वाचा…नाशिक : एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय प्रदेशाध्यक्षांवर अवलंबून,रावसाहेब दानवे यांची भूमिका

लासलगाव, अंकाई आणि निफाड रेल्वे स्थानकात मागील हंगामात दरमहा सरासरी ३० रेक वापरल्या गेल्या होत्या. यंदा कांदा वाहतुकीसाठी दरमहा ६० पेक्षा अधिक रेक उपलब्ध करण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले.

हे ही वाचा…Dhule Crime News: प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला! जिल्ह्यात निर्माण झाला तणाव, पोलीस म्हणाले…

मालधक्क्यावरही सुविधा

उन्हाळच्या तुलनेत लाल कांद्याचे आयुर्मान अतिशय कमी असते. त्यामुळे तो साठवून ठेवता येत नाही. तो लगेच बाजारात न्यावा लागतो. बिहारमधील फतुहा आणि आसाममधील चांगसारी येथे कांदा वाहतुकीसाठी कार्यक्षम प्रणालीची गरज व्यापाऱ्यांनी मांडली. रेल्वेमार्फत जादा रेक देऊन व्यापाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याची तयारी दर्शवण्यात आली. मालधक्क्यावर कामगार आणि व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र खोली, वीज, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. कसबे सुकेणे आणि निफाड येथे ही कामे झाली असून लासलगावचे काम प्रगतीपथावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.