शहराच्या मध्यवर्ती असलेल्या अतिशय वर्दळीच्या महात्मा गांधी (एमजी) रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर अस्ताव्यस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईने तोडगा काढण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न व्यापारी वर्गाच्या दबाव तंत्राने काहिसा निष्फळ ठरला. ना वाहनतळ क्षेत्रात उभ्या वाहनांवर इ चलनद्वारे कारवाई सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यास विरोध दर्शवित दुकाने बंद केली. अखेर रस्त्याच्या दुतर्फा वाहनतळाचे नव्याने रेखांकन झाल्यानंतर कारवाई करण्याचे निश्चित झाले. व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे पोलिसांना एक पाऊल मागे घ्यावे लागले.
हेही वाचा >>> वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे यांच्याविरुध्द गुन्हा
मध्यवर्ती बाजारपेठेतील महात्मा गांधी रस्त्याची स्थिती बेशिस्त वाहतुकीमुळे बिकट झाली आहे. वाहने अस्ताव्यस्तपणे रस्त्यावरच उभी करण्यात येत असल्याने बऱ्यापैकी रुंद असलेल्या या रस्त्याला बोळीचे स्वरुप प्राप्त होते. रस्त्यालगत भ्रमणध्वनी, इलेक्ट्रॉनिक, फोटो स्टुडिओ, वस्त्र प्रावरणे आदींची मोठ्या संख्येने दुकाने, बँकांसह अनेक खासगी कार्यालये आहेत. रस्त्यालगत विचित्र पध्दतीने वाहने उभी केली जातात. परिणामी सांगली बँक ते मेहेर सिग्नल दरम्यानची वाहतूक दिवसभर विस्कळीत असते. अन्य वाहनधारकांना मार्गस्थ होणे अवघड होते. व्यापारी संकुलांमध्ये वाहनतळ नसल्याने रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांनी जटील स्थिती निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर, बेशिस्त वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. रस्त्यालगत ना वाहनतळ क्षेत्रात उभ्या असणाऱ्या वाहनांचे छायाचित्र काढून इ चलन पाठविण्यास सुरुवात झाली. यात व्यापारी आणि ग्राहकांची वाहने होती. ५०० ते दीड हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार असल्याचे लक्षात येताच स्थानिक व्यापारी एकत्र आले. त्यांनी कारवाईला आक्षेप घेत इतरांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे काही वेळात रस्त्यावरील अनेक दुकाने बंद झाली.
हेही वाचा >>> धुळे : ऊसतोड कामगार पुरविण्याच्या नावाखाली फसवणूक
रस्त्यालगत वाहनतळासाठी रेखांकित जागेत व्यापाऱ्यांची वाहने उभी केलेली होती. परंतु, काही चारचाकी वाहने त्याबाहेर आली. तेव्हा पोलिसांनी आकाराने लहान वाहने घेण्याचा सल्ला दिल्याने वादात अधिकच भर पडल्याचे काही व्यापारी सांगतात. या कारवाईच्या निषेधार्थ अर्धा ते पाऊण तास बाजारपेठ बंद ठेवली गेली. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. या संदर्भात व्यापाऱ्यांनी वरिष्ठांकडे दाद मागण्याचे ठरविले. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली. महात्मा गांधी रस्त्यावर स्मार्ट सिटी कंपनीने वाहने उभी करण्यासाठी रेखांकन केले आहे. त्याच्या आतच वाहने उभी केली जात असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला. पदपथाची रुंदी वाढविल्याने वाहने उभी करण्यास कमी जागा मिळते. त्यामुळे वाहनांना पुरेशी जागा मिळेल, असे नव्याने रेखांकन करण्याची मागणी करण्यात आली. हे रेखांकन होईपर्यंत वाहनांवर कारवाई करू नये, असा आग्रह धरण्यात आला. वाहनतळ व्यवस्था आणि रेखांकन हे मनपा, स्मार्ट सिटी कंपनीशी संबंधित विषय आहेत. या संदर्भात त्यांना सूचित करण्याची तयारी पोलीस यंत्रणेने दर्शविली.
हेही वाचा >>> यावलमध्ये फर्निचर दुकानांवर कारवाई; वन लाकूड जप्त
बैठकीनंतर महात्मा गांधी रस्त्यावरील बेशिस्त वाहनधारकांवरील कारवाई तूर्तास थांबली. दुकाने पुन्हा सुरु झाल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. या घटनाक्रमात व्यापाऱ्यांच्या दबाव तंत्रामुळे बेशिस्त वाहनधारकांवरील कारवाईत अवरोध निर्माण झाल्याचे उघड झाले.
वाहनतळासाठी पुन्हा मैदानावर नजर महात्मा गांधी रस्त्यावर दुकाने, विविध कार्यालये, बँका मिळून २००-३०० आस्थापना आहेत. भ्रमणध्वनीसह विविध साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. या सर्वांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. काही वर्षांपूर्वी रस्त्याजवळील छत्रपती शिवाजी स्टेडिअमवर वाहनतळ व्यवस्थेचा प्रयोग करण्यात आला होता. परंतु, त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलाचे काम प्रस्तावित आहे. तिथे पुन्हा वाहनतळाची व्यवस्था करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. खरेदीसाठी येणारा ग्राहक मैदानातील वाहनतळात जाण्यास तयार नसतो. आपले उद्योग-व्यवसाय सुरळीत राखण्यासाठी बेशिस्त वाहनांवरील कारवाईला व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाबद्दल सामान्य नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.