स्मार्ट रस्ताकामांमुळे पोलिसांची परीक्षा
स्मार्ट रस्त्याच्या कामासाठी त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ मार्ग एकेरी करण्यात आल्याचे बरे-वाईट परिणाम सोमवारी पाहावयास मिळाले. त्र्यंबक नाक्याहून अशोक स्तंभापर्यंतची वाहतूक काही अडथळे वगळता सुरळीत झाली असताना या बदलांची माहिती नसल्याने ठिकठिकाणी वाहनधारकांचा गोंधळ उडाला. अशोक स्तंभ परिसरात अनेक रस्ते परस्परांना मिळत असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पर्यायी मार्गावर वेगळी स्थिती नव्हती. वाहनांची संख्या वाढल्याने लहान-मोठय़ा मार्गावर वाहतुकीचा ताण पडला.
अशोक स्तंभ-महात्मा गांधी रोड या एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयातून बाहेर पडणाऱ्या दुचाकीधारकांनी सीबीएसकडे जाण्यासाठी प्रतिबंधित मार्गाचा अवलंब करून नियम धाब्यावर बसवले. स्मार्ट रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोवर वाहनधारकांना दररोज या स्थितीला तोंड द्यावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
मेहेर सिग्नल ते सीबीएस दरम्यानचे काम पूर्ण झाले नसताना आता अशोक स्तंभ ते मेहेर आणि सीबीएस ते त्र्यंबकनाका या टप्प्यातील एका बाजूचे काम हाती घेण्यात आले. या बदलाआधी सीबीएस ते मेहेर सिग्नल दरम्यान सात महिने एका बाजूने दुहेरी वाहतूक सुरू होती. आता त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ एकेरी वाहतूक झाल्यामुळे वाहनधारकांना काहीअंशी दिलासा मिळाला. परंतु, गंगापूर रोड, घारपुरे पुलावरून आलेल्या वाहनधारकांची मेहेर, सीबीएस, त्र्यंबक नाकाकडे जाताना तारांबळ उडाली. अंतर्गत भागातील अरुंद मार्गावर वाहनांची आधीच प्रचंड वर्दळ असते. त्यात वाहनधारकांची संख्या वाढल्याने पादचाऱ्यांना मार्गक्रमण करणे अवघड झाले. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना चालकांची दमछाक झाली.
पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी
पंचवटीकडून येणारे वाहनधारक सीबीएसकडे जाण्यासाठी रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, शालिमार, शिवाजी रोड मार्गे सीबीएस असे मार्गस्थ होतात. पंचवटी, रविवार कारंजाकडून त्र्यंबक नाका सिग्नलकडे जाणाऱ्या वाहनधारकांना शालिमार, खडकाळी सिग्नल, जिल्हा परिषद हा पर्यायी मार्ग आहे. गंगापूर रोड, रामवाडी पुलाकडून येणाऱ्या वाहनधारकांना मेहेर सिग्नल, सीबीएस, त्र्यंबक नाक्याकडे जाण्यासाठी अशोक स्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक, शालिमार मार्गे सीबीएस आणि खडकाळी सिग्नल, जिल्हा परिषद मार्गे त्र्यंबक नाका असा पर्याय आहे. गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी मार्गे सीबीएस असे मार्गस्थ व्हावे लागते. सिडको, सातपूरकडून पंचवटीकडे जाणाऱ्या वाहनांनी मायको सर्कल, एचडीएफसी चौक, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका, रामवाडी किंवा ड्रिम कॅसलमार्गे पंचवटीकडे मार्गस्थ व्हावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मध्यवर्ती भागातील रस्त्यांचा आकार तेवढाच असून वाहनांची संख्या वाढत आहे. स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीवर र्निबध आले आहेत. रस्त्याचे काम लवकर करून पूर्ण होऊन तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करणे हा पर्याय आहे. वाहतुकीच्या र्निबधाबाबत फेरविचार करणे शक्य नाही. वाहनधारकांनी उपरोक्त मार्गाचा कमीतकमी वापर करावा. नियमांचे पालन करावे. जेणेकरून वाहतूक कोंडीच्या समस्या कमी करता येतील.
– पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील (वाहतूक)