लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : आदिवासी १७ संवर्ग पेसा पदभरती कृती समितीच्या वतीने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिल्याने परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

ईदगाह मैदानावर १२ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनस्थळी माजी आमदार जे. पी. गावित यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. आंदोलन स्थळी येणाऱ्या वाहनांमुळे मुंबई नाका, त्र्यंबक नाका, सीबीएस, मेहेर सिग्नल, जिल्हा रुग्णालयसमोरील रस्ता या ठिकाणी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली. या कोंडीतून वाट काढताना चालकांना द्राविडी प्राणायाम करावे लागले. ईदगाह मैदानावरील आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. याठिकाणी त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. या ठिकाणच्या कोंडीत शहर बससेवा, रिक्षा, दुचाकी अडकल्या. अखेर आंदोलक या ठिकाणाहून दूर झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

आणखी वाचा-वडाळा परिसर नाशिक मनपा क्षेत्रात आहे का? पाणी पुरवठ्यासह समस्याग्रस्त मोर्चेकऱ्यांचा प्रश्न

दरम्यान, मंगळवारी मनोज जरांगे यांची सभा आणि फेरीसाठी ठिकठिकाणी फलक, कमानी, तसेच व्यासपीठ उभारल्याने वाहतूक कोंडीत भर पडल्याचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले.