पुढील महिन्यात वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सजग व्हावे, नियमांचे पालन करावे, यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न होत असले तरी वाहनचालक त्याकडे कानाडोळा करतात हे गुरूवारी सकाळी दिंडोरी रस्त्यावरील तारवालानगर येथे झालेल्या विचित्र अपघाताने सिध्द झाले. अपघातात बससह टेम्पो आणि कार यांचे नुकसान झाले. अपघातग्रस्त टेम्पो सिग्नलच्या खांबाला धडकला. या धडकेमुळे परिसरातील सिग्नल यंत्रणा कोलमडली. अपघातात कोणतीही जिवितहानी नाही. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
कुंभमेळ्यानिमित्त शहर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वळण रस्त्यासह अनेक रस्त्यांचे विस्तारीकरण करण्यात आले. यामुळे आसपासच्या भागातील रस्त्यांवरून वाहने भरधाव मार्गस्थ होत असल्याने स्थानिकांसाठी ही डोकेदुखी ठरली आहे. गुरूवारी सकाळी साडेसात वाजता वाहनचालक अजिंक्य तपकिरे आपल्या मोटारीने हिरावाडी रस्त्याकडून तारवाला नगरमार्गे म्हसरूळकडे जात असतांना सिग्नल असल्याने चौफुलीवर थांबले. दिंडोरी रस्त्याकडील सिग्नल सुटला. त्यावेळी पलिकडच्या वळण रस्त्यावरून म्हसरूळकडून येणारी बस सिग्नलवर न थांबता थेट पुढे जाण्याच्या प्रयत्नात टेम्पोवर धडकली. परिणामी, टेम्पो सिग्नलवर उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळला. बस, कार आणि टेम्पो यांच्यातील विचित्र अपघातात चौफुलीवरील सिग्नलचा खांब पूर्ण कोलमडला. त्यात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. कारचालक आणि ट्रकचालक यांना दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. भल्या सकाळी झालेल्या या विचित्र अपघातानंतर बघ्याची एकच गर्दी उसळली. यामुळे अपघातग्रस्त वाहने बाजुला काढणे अवघड ठरले. त्याचा परिणाम या चौकात येणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीत झाला. गर्दीमुळे अपघातग्रस्त वाहने बाजुला काढताना पोलिसांना अडचणींना तोंड द्यावे लागले.
साधारणत: अर्धा तास चौफुलीवरील वाहतूक ठप्प राहिली. वाहनधारक सिग्नल सुटला नसताना तो तोडण्याचा प्रयत्न या अपघाताचे कारण ठरला. एका वाहनधारकाच्या चुकीची शिक्षा इतरांना सहन करावी लागली. त्यात सिग्नल यंत्रणाही निकामी झाल्यामुळे चौकात वाहुतकीचे वेगळेच प्रश्न निर्माण झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा