नाशिक : शहर परिसरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने स्वयंचलित नियंत्रण यंत्रणेची (सिग्नल) संख्या उदंड झाली आहे. मात्र वाहतुकीला शिस्त लागण्याऐवजी वाहनचालकांचा बेशिस्तीचा आलेख दिवसागणिक उंचावत आहे. शहर परिसरातील अनेक सिग्नलवर फेरीवाले आणि भिकाऱ्यांनी केलेले अतिक्रमण, रिक्षाचालकांची मुजोरी, स्वयंचलित वाहतूक यंत्रणेला आवाहन देणारी वाहनचालकांची उर्मी, यामुळे शहरात वाहतूक पोलीस आहेत की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस दला कडून अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण दिले जात असले तरी लवकरच बेशिस्त वाहनचालकांवर इ चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलीस वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. या प्रयत्नातंर्गत वाहनचालकांच्या वेगाला नियंत्रण बसण्यासाठी, अपघात टाळण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रक यंत्रणा, गतिरोधक बसविण्यात आले. याशिवाय पोलिसांकडून सातत्याने वेगवेगळ्या मोहिमांमधून वाहनचालकांच्या बेमूर्वतपणाला लगाम घालण्याचे प्रयत्न सुरू असतांना शहरात काही ठिकाणी सुरू असलेले सिग्नल हे नावापुरते उरले की काय, अशी स्थिती आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील शालिमार परिसरात गंजमाळ सिग्नल चौकातून भद्रकाली, जिल्हा परिषद, नाशिकरोड, शालिमारकडे वाहनचालकांची वर्दळ सुरु असते. मात्र या ठिकाणी सिग्नल सुरू असला तरी वाहनचालक बिनदिक्कत गाडी कुठेही ने-आण करतात. पोलिसांकडून लावलेले दुभाजक बाजूला करुन पुढे येण्याचा प्रयत्न वाहनचालकांकडून होतो. रिक्षाचालकांची मुजोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने बऱ्याचदा अपघात घडतात.

हेही वाचा…नाशिकमध्ये अपंगांसाठी राज्यातील पहिले नाट्यगृह, फ्रान्समधील फाऊंडेशनची आर्थिक मदत

या सर्व गोंधळात पोलीस आहेत की नाहीत, अशी शंका पादचाऱ्यांना, वाहनचालकांना येते. हीच स्थिती सह्याद्री रुग्णालयाजवळ असलेल्या सिग्नलची. काठे गल्ली, मुंबई नाका, द्वारका तसेच इंदिरानगरकडे ये-जा करणाऱ्यांची वर्दळ या ठिकाणी असते. परंतु, या ठिकाणीही वाहतूक यंत्रणा सुरू आहे की नाही, अशी स्थिती असते. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या नाशिक- त्र्यंबक रस्त्यावरील जलतरण तलावाजवळील सिग्नल, नाशिक-सातपूर रस्त्यावरील हॉटेल सिबल, पेठरोडवरील कृषी बाजार समिती, खडकाळी, राऊ हॉटेल, अशा काही ठिकाणी असलेल्या सिग्नलची दुरवस्था, वाहनचालकांचा बेमूर्वतपणा, हा वाहतूक पोलिसांना आवाहन देणारा ठरत आहे. वाहनचालकांची मुजोरी वाढत असतांना अनेक सिग्नलवर भिकारी, फेरीवाले यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.

याविषयी पोलीस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी माहिती दिली. शहरातील काही लहान सिग्नलवर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने लवकरच अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेकडून वॉर्डन मागवून काही सिग्नलवर त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. बेशिस्त वाहनचालकांवर ई चलनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे खांडवी यांनी सांगितले.

हेही वाचा…नाशिक: महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करुन बदनामीची धमकी, सिडकोतील घटना

धोकादायक चौक

शहरात ४० हून अधिक चौकात सिग्नल आहेत. यामध्ये शालिमार परिसरातील खडकाळी, सातपूर- त्र्यंबक रस्त्यावरील सिबल हॉटेलजवळील, पेठरोड येथील कृषी बाजार समिती, गंजमाळ, सह्याद्री रुग्णालयजवळील चौक धोकादायक आहेत.

हेही वाचा…Video: भयानक! ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे पर्यटकांच्या बसला अपघात; प्रवाशाच्या मोबाईलमध्ये धक्कादायक दृश्य कैद!

शहरातील वाहतूक विभागातील काही पोलीस हे पाथर्डी फाटा, इंदिरानगर बोगदा, एबीबी सर्कल, नाशिकरोड यासह अन्य गर्दीच्या ठिकाणी नेमण्यात आले आहेत. अन्य सिग्नलवर स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे वाहनचालकांना ई चलनाद्वारे दंड होईल. तसेच स्मार्ट सिटीकडे ६० वॉर्डन मागितले आहे. ही नियुक्ती झाल्यासह अन्य ठिकाणी हे मनुष्यबळ वापरता येईल. – चंद्रकांत खांडवी (पोलीस उपआयुक्त)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic indiscipline soars in nashik despite increased automatic signals traffic police to enforce stricter measures psg
Show comments