नाशिक – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने शहरातून जाणाऱ्या मुंबई -आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर रस्ता दुरूस्तीच्या कामास सुरूवात झाली आहे. या कामाची पूर्वकल्पना वाहनचालकांना नसल्याने नवरात्रोत्सव काळात वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
महामार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर गोंदे ते पिंपळगाव बसवंत दरम्यान पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यासाठी दुरूस्तीचे काम ठिकठिकाणी हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील कामास जूनमध्ये सुरूवात झाली गोंदे -आंबेबहुला परिसरातील दोन्ही बाजूकडील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. आता नाशिक येथील गरवारे पॉइंटपासून पुढील टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, याविषयी शहरातील वाहतूक विभागाला कुठलीही पूर्वकल्पना न देता कामास सुरूवात झाली. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. मुंबई नाकासह इंदिरा नगर बोगदा, द्वारका परिसर, त्र्यंबक नाका या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत असताना उड्डाणपुलावर सुरू असलेल्या कामामुळे कोंडीत भर पडत आहे. महामार्ग प्राधिकरणच्या वतीने उड्डाणपुलावर पावसामुळे पडलेले खड्डे भरण्याचे तसेच काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी पांडवलेणी तसेच साई पॅलेस हॉटेलजवळ वाहतूक वळविण्यात आली आहे. तसे फलक लावण्यात आले आहेत. याबाबत वाहनचालकांना पूर्वकल्पना नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
याविषयी पोलीस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी, प्राधिकरणच्या वतीने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी याविषयी वाहतूक विभागाशी कुठलाही पत्रव्यवहार झालेला नसल्याचे सांगितले.
कामामुळे खाेळंबा, पण…
उड्डाणपुलावरील कामामुळे वाहतूक खोळंबा होत असल्याचे मान्य आहे. परंतु, पुढील वर्षी रस्ता चांगला असावा यासाठी हे काम महत्वाचे आहे. जूनपासून कामाला सुरूवात झाली असून मेपर्यंत हे काम पूर्ण होईल. वेळोवेळी त्या त्या परिसरातील पोलिसांशी संपर्क करण्यात येत आहे. नाशिक शहर पोलिसांशी याविषयी पत्रव्यवहार करण्यात आला. सण उत्सव काळात गर्दी होत आहे. त्याला नाईलाज आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्यात येणार आहेत- बी. एस. साळुंके (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण)