लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव – तालुक्यातील वडनगरी फाट्यानजीक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलासह मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडीला जळगावकरांना सामोरे जावे लागले. त्यामुळे सोहळ्याच्या नियोजनाच्या दिमतीला पोलीस दलाचे १२०० कर्मचारी, गृहरक्षक दलाचे ६५० पेक्षा अधिक जवान असूनही वाहतुकीचा बोजवारा उडाला.

तालुक्यातील वडनगरी फाट्यानजीक बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात सुमारे ३०० एकर जागेत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला.

सोहळ्यास प्रचंड गर्दी लक्षात घेता, पोलीस प्रशासनाकडूनही वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढली. त्याअनुषंगाने शहरातील मारुती चौकापासून खेडी, आव्हाणे फाटा, वडनगरी फाट्याकडे जाणारी-येणारी वाहतूक ११ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. शिवमहापुराण कथेच्या काळात वाहतूक कोंडी अथवा त्यामुळे अन्य कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी वाहतुकीसाठी सुचविलेल्या मार्गांचा अवलंब करीत, नियमांचे पालन करीत सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक डी. डी. इंगोले यांनी केले. मात्र, मंगळवारी पहिल्याच दिवशी सकाळपासूनच शहरातील मध्यवर्ती भागासह शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी झाली होती. ती लक्षात येताच पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी धावपळ झाली. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ वाहतूककोंडी होती.

आणखी वाचा-धुळ्यात जिंदाल स्टिलच्या नावाने बनावट कारखाना, मालक ताब्यात

शहरातील गोविंदा रिक्षाथांबा, नेहरू पुतळा चौक, रेल्वेस्थानक परिसर, टॉवर चौकासह शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल, तसेच पिंप्राळ्याकडून शिवाजीनगरकडे जाणार्‍या रस्त्यावरील सुरत रेल्वेफाटक, दूध फेडरेशन यांसह विविध भागांत झालेल्या वाहतुकीकोंडीला जळगावकरांना सामोरे जावे लागले. तसेच टॉवर चौक, शिवाजीनगर, ममुराबाद रस्त्यामार्गे विदगाव, रिधूर, आमोदा खुर्दमार्गे भोकरकडे आणि टॉवर चौकातून दुसरा मार्ग अर्थात भिलपुरा, लेंडी नाला, ममुराबाद रस्त्यामार्गे विदगाव, रिधूर, आमोदा खुर्दमार्गे भोकरकडे जाणार्‍या रस्त्यावरही वाहतुकीची प्रचंड वर्दळ होती. शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. ती गुजराल पेट्रोलपंप, सुरत रेल्वेफाटक, दूध फेडरेशन, शिवाजीनगर, ममुराबाद रस्त्यामार्गे विदगाव, रिधूर, आमोदा खुर्दमार्गे भोकरकडे जाणार्‍या रस्त्यावरही वाहतुकीचा प्रचंड भार आला होता.

कथास्थळी जाण्यासाठी पर्याय

भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, पहूर, धुळे या भागातील भाविकांना शिवाजीनगर उड्डाणपुलावरून आव्हाणे फाटा, खेडी फाटा यामार्गे कथास्थळी जाता येणार आहे. या मार्गावर चार ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था आहे. तसेच आव्हाणे फाट्याच्या अलीकडे दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी व्यवस्था आहे. आणि फाट्याच्या पुढे बस, टेम्पो व त्याच्या बाजूला मोटारी, तसेच खेडी फाट्यानजीक मोटारींसाठी वाहनतळाची व्यवस्था आहे. चोपड्याकडून येणार्‍या मार्गांवर कथास्थळाकडे येताना डाव्या बाजूला चार वाहनतळे आहेत. त्यातील दोन ठिकाणी मोटारी, बस, टेम्पो व अखेरच्या भागात दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी व्यवस्था आहे. या रस्त्याच्या उजव्या बाजूला वाहनतळासाठी जागा राखीव ठेवली आहे. तरसोद फाट्यावरून पर्याय आहे. तेथून बायपासकडून ममुराबादमार्गे कथास्थळी जाता येईल. यासाठी या मार्गावर तीन ठिकाणी वाहनतळे आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in jalgaon even when thousands of police home guard force are on duty mrj
Show comments