जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एक वाहतूक पोलीस केळीने भरलेली मालमोटार अडवून चालकाकडे ५०० रुपयांची मागणी करत होता. परंतु, चालक ५० पेक्षा एक रुपया जास्त देण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिसाने, आमची इतकीच इज्जत आहे का, असे म्हणत मिळालेले पैसे नाईलाजाने स्वीकारले. मालमोटारीच्या चालकाने पोलिसाला अद्दल घडविण्यासाठी दोघांमधील संभाषणाची चित्रफीत घटनेला काही महिने झाल्यानंतर समाज माध्यमात टाकली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी सदर वाहतूक पोलिसाचे रविवारी निलंबन केले.

पाचोरा-चाळीसगाव रस्त्यावर नियमितपणे माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना रस्त्यात अडविण्याचे आणि पोलिसांकडून पैशांची मागणी करण्याचे प्रकार कायम होत असतात. नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या अशाच एका चालकाने पोलिसांकडून पैशांची मागणी करण्यात आल्यावर भ्रमणध्वनीद्वारे चित्रफीत तयार करण्याची शक्कल लढवली. वाहतूक पोलीस ५०० रुपयांची मागणी करत असताना, चालक ५० रुपये घेण्याची विनंती करत होता. घासाघीस करून शेवटी पोलीस १०० रुपयांवर आला, तरीही मालमोटारीचा चालक आम्ही तुम्हाला नेहमीच पैसे देतो, असे म्हणत फक्त ५० रुपये देण्यावर ठाम राहिला. त्यामुळे समोरचा वाहतूक पोलीस आमची ५० रुपयांएवढीच इज्जत आहे का, असे म्हणत चिडल्याचे चित्रफितीत दिसते.

दोघांमध्ये अहिराणी भाषेत झालेल्या संवादाची चित्रफीत तीन ते चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आली आहे. मात्र, ती आता समाज माध्यमात आल्यावर पोलिसांमध्ये खळबळ उडाली. प्रशासनाने संबंधित वाहतूक पोलिसाचे निलंबन केले आहे.

वाहतूक पोलिसांचे वादग्रस्त किस्से कायमच चर्चेत असतात. प्रामुख्याने ज्या ठिकाणी वाहनधारकांकडून अधिक पैसे घेता येतील, त्याच रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी कायम केली जाते. विशेष म्हणजे, काही वाहनधारकांकडे सर्व कागदपत्रे असतानाही किरकोळ त्रुटी काढून पैसे मागितले जाण्याच्या तक्रारी होत असतात. अशा पोलिसांवर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असून पाचोरा-चाळीसगाव रस्त्यावर वाहन चालकाकडे ५०० रुपयांची मागणी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला निलंबित करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

मालमोटारीच्या चालकाकडून कर्तव्यावर असताना पैशांची मागणी करणाऱ्या वाहतूक पोलिसाची चित्रफीत शनिवारी पाहण्यास मिळाली. पवनकुमार पाटील असे संबंधित वाहतूक पोलिसांचे नाव असून, त्यास तातडीने निलंबित करण्यात आले आहे. – डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव)