मालेगाव – संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव शहराचा होणारा वाढता विस्तार आणि वाहतुकीचा पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेता शहर वाहतूक पोलीस शाखेसाठी मनुष्यबळ तोकडे पडत असून त्यामुळे समस्या निर्माण होत असल्याकडे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने बोट ठेवले आहे. आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे समितीने पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना साकडे घातले आहे.शांतता समितीच्या बैठकीसाठी येथे आलेल्या उमाप यांना समितीतर्फे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत शहरातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेसंदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनात शहर वाहतूक शाखेतील अपुऱ्या मनुष्यबळावर समितीने बोट ठेवले आहे. काही वर्षात शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला असून जवळपास १० लाखापर्यंत लोकसंख्या पोहोचली आहे.
हेही वाचा >>> उड्डाण पुलावरून कोसळणाऱ्या जलधारा थांबवा, देवयानी फरांदे यांची महामार्ग दुरुस्तीची सूचना
एक लाख छोटी मोठी व प्रवासी वाहने शहरात आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागासह कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव आदी तालुक्यातील नागरिकांचे शहरात नियमित येणे-जाणे होत असते. तसेच मिस्त्र लोकवस्तीच्या मालेगावात वर्षभर सण, उत्सव आणि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. यंत्रमागाचे शहर असलेल्या मालेगावात प्लास्टिक तसेच लाकडावर प्रक्रिया करणाऱ्या छोट्या-मोठ्या उद्योगांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे अवजड आणि माल वाहतूक करणाऱ्या अन्य वाहनांचा शहरात मोठ्या प्रमाणावर राबता असतो.
हेही वाचा >>> कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे नाशिक महापालिकेचे अंशत: काम आता कंत्राटी पद्धतीने; ‘या’ सेवांचे खाजगीकरण…
साहजिकच शहराच्या वाहतुकीवर त्याचा प्रचंड ताण येत असताना या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस शाखेकडे मात्र पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, हे समितीने लक्षात आणून दिले आहे. सध्या मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. मोसम पुलाचा एक भाग तोडण्यात येऊन तेथे नवीन पूल निर्मितीचे काम सुरू आहे. त्यामुळे मोसम पूल चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अपघात घडत आहेत. अलीकडेच झालेल्या एका दुर्घटनेत अलोक जयस्वाल या बालकाला जीव गमवावा लागल्याचे नमूद करीत अशा प्रकारच्या घटनांमध्ये आजवर चार ते पाच जणांचा बळी गेल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे. शहरातील वाहतूक नियोजनासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आजवर अनेकदा केली गेली. परंतु, पोलीस प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत असल्याचा सूर समितीने यावेळी लावला. शहर वाहतूक पोलीस शाखेला पूर्णवेळ पोलीस निरीक्षक दर्जाचा प्रभारी अधिकारी तसेच तीन ते चार दुय्यम अधिकारी यांच्यासह आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावेत, असा आग्रह समितीने धरला. या प्रसंगी समितीचे निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, विवेक वारुळे, जितेंद्र देसले, अक्षय महाजन, संदीप अभोणकर, प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.