नाशिक – मुंबई-आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील सात किलोमीटरच्या मार्गाचे डांबरीकरण युद्धपातळीवर केले जात आहे. शुक्रवारपर्यंत ते पूर्णत्वास नेण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने केली आहे. त्यामुळे वाहतुकीचे लागू केलेले निर्बंध लवकर शिथील होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने जुन्या कसारा घाटात दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक-मुंबई दरम्यानच्या घाटातील मार्गावर सोमवारपासून गुरुवारपर्यंत आणि नंतर तीन ते सहा मार्च या कालावधीसाठी वाहतूक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत जुन्या कसारा घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जातो. मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहने उपरोक्त काळात नवीन कसारा घाटमार्गे जातात. सायंकाळनंतर सकाळी आठपर्यंत ही वाहतूक पुन्हा जुन्या कसारा घाटातील नेहमीच्या मार्गाने होत आहे. या कालावधीत मुंबई-नाशिक आणि नाशिक-मुंबई या कसारा घाटातील दोन्ही मार्गांवर अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद ठेवली आहे.

मुंबई-नाशिक मार्गावरील जुन्या कसारा घाटातील मार्ग सात किलोमीटरचा आहे. त्याच्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. शुक्रवारपूर्वी हे काम पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे एनएचआयचे अधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले. हे काम लवकर पूर्ण झाल्यास जुन्या कसारा घाटात मार्चमध्ये वाहतूक निर्बंध कायम ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही, असे त्यांनी सूचित केले. जुन्या कसारा घाटातील दुरुस्ती कामामुळे सध्या सकाळ ते सायंकाळपर्यंत वाहनधारक नवीन घाटातील मार्गाने मार्गक्रमण करतात. चिंतामणवाडी पोलीस चौकीसमोरून ते एकेरी मार्गाने जातात. सायंकाळी सहानंतर जुना कसारा घाट सकाळपर्यंत वाहतुकीसाठी खुला असतो.

जुना घाट आज संपूर्ण दिवस वाहतुकीसाठी खुला

योग्य व्यवस्थापन आणि नियोजन केल्यामुळे कुठेही वाहतूक कोंडीसारखे प्रकार घडले नाहीत. निर्बंध काळात नवीन कसारा घाटातील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती महामार्ग पोलीस विभागाचे सहायक निरीक्षक राम व्होंडे यांनी दिली. बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त कसारा घाटातील काम बंद ठेवण्यात येणार आहे. जुना घाट वाहतुकीसाठी पूर्णवेळ सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader