लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : शहर परिसरात रामनवमीनिमित्त बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोड येथे मुक्तीधाम परिसर आणि पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक विभागाच्या वतीने मंदिर परिसरातील मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत.

रामनवमीनिमित्त पंचवटी येथील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. मंदिराकडे सरदार चौकापासून जाणारा रस्ता अरूंद असल्याने या मार्गावर वाहतुकीची वर्दळ धोकादायक ठरु शकते. हे लक्षात घेऊन भाविकांच्या सुरक्षेसाठी सरदार चौक ते काळाराम मंदिर रस्ता सकाळी सात ते रात्री १० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आणखी वाचा-मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक

नाशिकरोड परिसरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुक्तीधाम परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मुक्तीधाम मंदिर-बिटको चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-रेल्वे स्थानक-सुभाष रोड-सत्कार पॉइंट-देवळाली गावमार्गे मुक्तीधाम असा मिरवणुकीचा मार्ग आहे. या मिरवणुकीत २० ते २५ हजार नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी पाहता वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.

बुधवारी दुपारी तीन ते मिरवणूक संपेपर्यंत सत्कार पॉईंट ते बिटको सिग्नलकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना बंद राहील. रेल्वे स्थानकाकडून सत्कार पॉइंटकडे जाणारी मार्गिका सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे. दत्त मंदिर सिग्नलपासून बिटको चौकमार्गे रेल्वे स्थानकाकडून सत्कार पॉईंटकडे जाणारी मार्गिका सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic restrictions in muktidham kalaram mandir area on the occasion of ram navami mrj