नाशिक – दसऱ्यानिमित्त चर्तुसंप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास महाराज यांच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी सहा वाजता गोदा काठावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामुळे गोदाकाठावर होणारी गर्दी लक्षात घेता मालेगाव स्टँण्डकडून गोदाकाठाकडे जाणारे रस्ते दुपारी तीन ते रात्री १० या वेळेसाठी बंद करण्यात येणार आहेत.
चर्तुसंप्रदाय आखाडाच्या वतीने गोदाकाठावर दसऱ्या निमित्त रावण दहनाचा कार्यक्रम होतो. रावण दहन करण्यापूर्वी राम, लक्ष्मण सेनेची मिरवणूक आखाडाच्या वतीने सायंकाळी काढण्यात येते. मालेगाव स्टँण्डकडून पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, सितागुंफा रस्त्याने श्री काळाराम मंदिर -सरदार चौक-साईबाबा मंदिरमार्गे रामकुंड वाहनतळ मैदानावर आल्यावर राम व रावणाचे युध्द होईल. त्यानंतर रावण दहनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहर पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला आहे. मालेगाव स्टँण्डकडून रामकुंड, सरदार चौक ते गाडगे महाराज पुलापर्यंत ते गाडगे महाराज पुलाकडून सरदार चौक ते मालेगाव स्टॅण्डकडे सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात आला. ही वाहने गणेशवाडी, काट्या मारूती चौकी, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा येथून इतरत्र जातील.