नाशिक – शहरातील अनेक भागांमध्ये खड्डेमय रस्ते, रस्त्यांच्या अरुंदपणामुळे वाहनधारकांची होणारी गैरसोय, यासारख्या समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांकडून प्रयत्न करण्यात येत असले तरी त्यांची दखल घेतली जात नाही. परंतु, एखादा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येते. त्वरीत त्या भागात कार्यवाही केली जाते. मागील आठवड्यात प्राणवायू सिलिंडरचा धावत्या वाहनातच स्फोट झाल्याने हादरलेल्या गंगापूर रोड परिसरातील शांतीनिकेतन चौकातील रहिवाशीही सध्या हाच अनुभव घेत आहेत. स्फोटानंतर शांतीनिकेतन चौकाचे रुप पालटत असून काँक्रिटीकरणासह झेब्रा क्राॅसिंग, गतिरोधकाची उंची कमी करणे, अशी कामे प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे एखाद्या भागात सुविधांसाठी अपघात होणे गरजेचे आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील काही ठिकाणी कायमच अपघात होत असतात. तारवाला नगर चौफुली, बळी महाराज चौफुली, हाॅटेल मिरची चौफुली, हाॅटेल जत्रा चौफुली ही त्यापैकी काही उदाहरणे. याशिवाय शहरातील अन्य काही भागांतही अपघात होत असतात. या अपघातप्रवण चौकांपैकी एक म्हणजे गंगापूर रोड परिसरातील शांतीनिकेतन चौक. या चौकात काही वर्षांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला मालवाहतूक वाहनाची धडक बसली होती. चौकात त्यानंतरही काही अपघात झाले. अपघात रोखण्यासाठी चौकात काही व्यवस्था करण्यासंदर्भात स्थानिकांकडून मागणी करण्यात आली. परंतु, महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही.
मागील आठवड्यात खासगी रुग्णालयांना प्राणवायू सिलिंडरचा पुरवठा करणारे वाहन या भागातून निघाले होते. गतिरोधकावरून जाताना त्यातील काही सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे जवळच्या काही इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. घरांचे नुकसान झाले. कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी स्फोटाच्या तीव्रतेने सर्वच हादरले. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी हे अपघातप्रवण क्षेत्र सुरक्षित करण्याची मागणी करण्यात येऊ लागली.
नागरिकांच्या सूचना, या चौकात होत असलेले अपघात पाहता प्रशासनाला अखेर जाग आली. नागरिकांकडून सातत्याने होणाऱ्या मागणीचा विचार करुन महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून शांतीनिकेतन चौकात खड्डे बुजवण्यासाठी काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. झेब्रा क्रॉसिंग करण्यात येत आहे. गतिरोधकाची उंची कमी करण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. प्रशासनाकडून होत असलेल्या उपयांबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी कोणताही अपघात होण्याआधीच अशा उपाययोजना करण्याची गरज मांडण्यात येत आहे.
हेही वाचा – नाशिक : नर्तनरंगतर्फे नृत्य महोत्सवाची तयारी, शुक्रवारी कथक तालांचे समग्र दर्शन
शहर परिसरातील अनेक अपघातप्रवण क्षेत्रांविषयी महापालिका तसेच अन्य आस्थापनांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याअंतर्गत शांतीनिकेतन चौकात काम सुरू आहे. पावसामुळे झेब्रा क्रॉसिंग करण्यासाठी अडचण येत असल्याने काम थांबले होते. – डॉ. सचिन बारी (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा)