गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीवर र्निबध
शहरात गणेशोत्सवास उत्साहात सुरुवात झाल्यानंतर आता देखावे बघण्यासाठी बालगोपाळांसह कुटुंबीयांची लगबग सुरू झाली आहे. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवसांसह अखेरच्या टप्प्यात देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. यामुळे मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नऊ मार्ग वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली असून बुधवापर्यंत वाहतुकीवरील हे र्निबध कायम राहणार आहेत.
पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी शुक्रवार ते बुधवार या कालावधीत सायंकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत नऊ मार्ग वाहनविरहित ठेवण्याचे निश्चित केले आहे. या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सारडा सर्कलकडून खडकाळी सिग्नल, शालिमारमार्गे सीबीएसकडे जाणारा मार्ग, खडकाळी सिग्नल येथून दीपसन्स कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड आणि बादशाही कॉर्नरकडे जाणारा रस्ता, त्र्यंबक पोलीस चौकी ते बादशाही कॉर्नर, सीबीएस सिग्नल येथून शालिमार, नेहरू उद्यानाकडे ये-जा करणारा मार्ग, मेहेर सिग्नल ते सांगली बँक सिग्नल, धुमाळ पॉइंट, दहीपुलाकडे ये-जा करणारी वाहने, प्रतीक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारा मार्ग, अशोक स्तंभ ते रविवार कारंजा- मालेगाव स्टँडचा रस्ता, मालेगाव स्टँड-रविवार कारंजाकडून सांगली बँक सिग्नल मार्गे शालिमारकडे जाणारी वाहने यांचा समावेश आहे. या नऊ मार्गावर सायंकाळी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. वाहनधारकांनी सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, मोडक सिग्नल, सीबीएस, मेहेर, अशोक स्तंभ, रामवाडीमार्गे मखमलाबाद नाका, पेठ रोड, दिंडोरी नाका या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. मालेगाव स्टँडकडून येणारी वाहने मखमलाबाद नाका, रामवाडीमार्गे जुना गंगापूर नाका सिग्नल येथून इतरत्र जातील. गर्दीची ठिकाणे वगळता इतर पर्यायी मार्गाचा अवलंब वाहनधारकांना करता येईल, असे पौर्णिमा चौगुले यांनी म्हटले आहे.
चार मार्गावर प्रवेश बंद
भालेकर मैदानावर औद्योगिक वसाहतीतील सार्वजनिक मंडळांसह अन्य मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. या ठिकाणी देखावे पाहण्यास गर्दी होते. यामुळे सायंकाळी सहा ते रात्री १२ या कालावधीत मोडक, खडकाळी सिग्नलकडून कालिदास कलामंदिरमार्गे शालिमार, सुमंगल दुकानाकडे येणारा मार्ग दोन्ही बाजूने जाण्या-येण्यास प्रवेश बंद राहील. सीबीएसकडून गायकवाड क्लासमार्गे कान्हेरे वाडीकडील रस्ता सर्व वाहनांसाठी बंद राहील. पंचवटी विभागात सरदार चौक ते काळाराम मंदिरापर्यंतचा रस्ता, तर मालवीय चौक ते गजानन चौक, गजानन चौक ते नागचौक, नागचौक ते शिवाजी चौक हे मार्गही दोन्ही बाजूने वाहनांसाठी बंद राहतील.
विसर्जनासाठी स्वतंत्र उपाय
गणेशोत्सवात पाचव्या आणि सातव्या दिवशी घरगुती, सार्वजनिक गणरायाच्या विसर्जनासाठी पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वतंत्र उपाययोजना करण्यात आली. निमाणी स्थानकातून पंचवटी, रविवार कारंजामार्गे जाणाऱ्या शहर वाहतुकीची बससेवा तसेच जड वाहनांना उपरोक्त मार्गावर दुपारी चार ते रात्री १२ पर्यंत प्रवेश बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून त्याची अमलबजावणी करण्यात आली. वाहनधारकांना पंचवटी कारंजा, काटय़ा मारुती चौक, कन्नमवार पूल, द्वारका मार्गाचा पर्याय उपलब्ध आहे. सीबीएसकडून पंचवटीकडे ये-जा करणाऱ्या सर्व वाहनांना अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा मार्गावर वाहतुकीस प्रतिबंध आहे. संबंधित वाहनधारकांना अशोक स्तंभ, रामवाडी पूल, मखमलाबाद नाका, पेठ नाका सिग्नलमार्गे पुढे जाता येईल. सातव्या दिवशी म्हणजे रविवारी हे र्निबध लागू राहणार आहेत.