लोकसत्ता वार्ताहर
धुळे : पुष्पा या अलु अर्जुनच्या गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटात ज्याप्रमाणे चंदनाची वाहतूक मालवाहू वाहनातून छुप्या पध्दतीने केली जाते, त्या पद्धतीनुसार मालवाहू वाहनाच्या तळाशी चोरकप्पा तयार करून बेमालूमपणे होणारी बनावट देशी दारूची वाहतूक धुळे जिल्ह्यात पोलिसांनी उघड केली आहे. या कारवाईत तीन लाख दोन हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चौघा संशयितांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी चाळीसगाव रस्त्यावरील जामचा मळा भागात छापा टाकून बनावट देशी दारू वाहून नेणारे वाहन पकडण्यात आले. मालवाहू वाहनाच्या तळाशी उघडझाप करणारा पत्र्याचा कप्पा बनवून त्यात संशयित नारायण माळी (रा.शिरपूर), श्रीराम बाबर, महेंद्र चौधरी (दोन्ही रा.साक्री) यांनी जवळपास ९७ हजार रुपयांची बनावट देशी दारू ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी चंद्रप्रकाश पाटील (रा.पद्मनाभ नगर,मोगलाई, धुळे) याची आधी चौकशी केल्यावर ही चोरटी वाहतूक उघड झाली.
आणखी वाचा-धुळे जिल्ह्यात सरपंचावर तलवारीने हल्ला, पदाचा राजीनामा न दिल्याचा राग
कुठलेही अधिकृत कागदपत्र नसताना आणि परवाना नसताना संशयितांनी ही दारू विक्री करण्याच्या उद्देशाने वाहनात चोरून ठेवली होती. पोलिसांनी या कारवाईत ९७ हजार रुपयांची बनावट दारू, पाच हजार रुपयांचा भ्रमणध्वनी आणि दोन लाख रुपयांचे वाहन असा तीन लाख दोन हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चारही संशयितांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.