नाशिक – २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मनुष्यबळ, निधी, मूलभूत गरजा, या त्रिसूत्रीवर प्रशासन काम करत आहे. पोलीस दलही आता अतिरिक्त मनुष्यबळासाठी विद्यार्थ्यांना स्वयंसेवकांच्या भूमिकेत पाहत आहे. संबंधितांवर वाहतूक नियंत्रण, भाविकांना मार्गदर्शन अशी जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.
प्रयागराज कुंभमेळ्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले असतानाही अपेक्षेपेक्षा अधिग गर्दी, अपुऱ्या मनुष्यबळाअभावी आलेल्या अडचणी, उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती, झालेली जीवितहानी पाहता अशी परिस्थिती नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. प्रयागराज येथे तीन हजार हेक्टरहून अधिक जागा कुंभमेळ्यासाठी उपलब्ध असतांना नाशिक-त्र्यंबकमध्ये मात्र अपुरी जागा, संकुचित गोदाकाठ, काँक्रिटीकरण यासह वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
कुंभमेळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभागाकडून नियोजनास सुरूवात झाली आहे. शहराची इत्यंभूत माहिती असलेल्या लोकांच्या मदतीने नाशिक पोलीस नियोजनावर भर देत आहेत. त्यात गर्दीचे व्यवस्थापन, बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांना घाटापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था, त्यांची निवास आणि भोजन व्यवस्था, पर्वणी काळात गोदाकाठावर शाहीस्नानावेळी मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीचे विभाजन कशा पध्दतीने करता येईल, यासह वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यात येत आहे.
यासाठी बाहेरील जिल्ह्यातून बंदोबस्त मागविण्यात येईल. सीसीटीव्ही तसेच नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सर्व घडामोंडीवर लक्ष देण्यात येणार आहे. पर्वणीकाळात चोवीस तास काम करणाऱ्या पोलीस दलासाठी मदतीचा हात म्हणून विद्यार्थ्यांना स्वयंसेवकांची भूमिका देण्यात येणार आहे. या संदर्भात शहर तसेच शहरानजीक असलेल्या १५० हून अधिक महाविद्यालयांमधील राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना यातील निवडक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण आणि जबाबदारी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पुढील दोन ते तीन महिन्यात स्वयंसेवक म्हणून प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये भाविकांना रस्ता दाखविणे, वाहतूक नियंत्रणासाठी मदत करणे, मदत कक्षात सेवा देणे यासह वेगवेगळी कामे सोपविण्यात येणार आहेत. स्वयंसेवक म्हणून ११ वी, १२ वी, महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा विचार होत आहे.