तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा;  मुख्यमंत्र्यांसह नगरसेवकांना प्रतिवादी  करणार

महापालिकेत पारदर्शक कारभार करणारे तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करून राज्य सरकारने त्यांची पुन्हा आयुक्तपदी नियुक्ती न केल्यास मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, सर्व नगरसेवकांना प्रतिवादी करून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी दिला आहे. मुंढे यांच्या समर्थनार्थ ‘आम्ही नाशिककर’च्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दमानिया यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. पालिका आयुक्तपदी मुंढे यांची नेमणूक करावी, याकरिता शहरात स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे.

महापालिकेत कठोर शिस्तीचा कारभार भाजपला अडचणीचा ठरल्याने सरकारने कार्यकाल पूर्ण होण्याआधीच आयुक्त मुंढे यांची बदली केल्याचा आम्ही नाशिककरचा आक्षेप आहे. मुंढे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या अनियमित कामांना चाप लावला. यामुळे सत्ताधारी-विरोधकांनी एकत्रित येऊन मुंढे यांची बदली केली. आयुक्तपदाचा कार्यभार सरकारने कोणाकडे सोपविलेला नाही. मुंढे यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी ‘आम्ही नाशिककर’च्या छताखाली एकवटलेल्या संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून मोर्चा काढला.

अंजली दमानिया, जितेंद्र भावे, सचिन मालेगावकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेकरी विविध फलक हाती घेऊन शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आले. काही मोर्चेकरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले. केवळ पाच जणांच्या शिष्टमंडळाला आतमध्ये प्रवेश दिला जाईल, असे पोलिसांनी सूचित केले. यामुळे पुन्हा मतभेद झाले. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देऊन घोषणाबाजी केली.  जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीनंतर सर्व मोर्चेकऱ्यांना आतमध्ये प्रवेश दिला गेला.

राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदन देऊन दमानिया यांनी नागरिकांची भावना मांडली. मुढे यांच्यासारख्या चांगल्या कार्यक्षम अधिकाऱ्याच्या पाठीशी सर्वानी उभे राहायला हवे. नवी मुंबई येथे सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन मुंढे यांची बदली केली. त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्ये झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांची बदली केली.

ती तातडीने रद्द न केल्यास शहरातील चौकाचौकात नागरिक स्वाक्षरी मोहीम राबवतील. या आधारे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल, असे दमानिया यांनी सूचित केले.

मुंढेंच्या बदलीचे कारण सांगावे

मोर्चेकऱ्यांनी हाती धरलेले फलक आणि दिलेल्या घोषणांनी सर्वाचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार आणि नगरसेवकांनी मुंढे यांच्या बदलीचे कारण सांगावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. सभागृहात सेटिंग-बेटिंग, टक्केवारीचा कारभार चालणार नाही.. मुंढे हलणार नाहीत.. फॉर्च्युनर गाडय़ा घेऊन फिरणारे नगरसेवक चालणार नाही.. प्रत्येक निविदेत टक्केवारी चालणार नाही.. ‘रामायण’समोर फटाके फोडणाऱ्या महापौर चालणार नाहीत.. मुंढे इथून हलणार नाहीत, अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी लोकप्रतिनिधींविरोधात आपला रोष प्रगट केला.

Story img Loader