शहरातील वाहतुकीच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे वाहतुकीतील हे अडथळे उद्योगांचेही नुकसान करीत आहे. ठोस उपायांअभावी नाशिकच्या विकासाला खीळ बसली असून वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजनेची गरज नाशिक जिल्हा वाहतूकदार संघटनेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.

हेही वाचा >>> जळगाव: मधुकर साखर कारखाना कर्मचार्‍यांचे महामार्गावर आंदोलन – सहकार मंत्र्यांकडून विक्री प्रक्रियेला स्थगिती

शहराच्या विस्ताराबरोबर वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा सर्वाधिक फटका वाहतूकदारांना बसत असून यावर तोडगा काढण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रश्नावर संघटनेचे पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वाहतुकीच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसह अन्य शहरात औद्योगिक वसाहतीमध्ये अवजड वाहनांसाठी चांगल्या सुविधा असल्याने तिथे वाहतुकीचे प्रश्न कमी झाले. उद्योगही वाढीस लागले. नाशिकमध्ये विपरित स्थिती आहे. अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. पुणे, मुंबई, ओझर, औरंगाबाद, गुजरात, पेठ, दिंडोरीच्या दिशेने येणाऱ्या वाहतूकदारांना शहराबाहेर ट्रक टर्मिनलची आवश्यकता आहे. या सुविधा नसल्याने वाहतुकीत अधिक अडथळे निर्माण होतात. अपघाताचे प्रमाणही वाढत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

हेही वाचा >>> जळगाव: गाड्यांच्या चाव्या जमा करण्याच्या इशाऱ्यानंतर वॉटरग्रेस कामगारांचे आंदोलन मागे

द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मध्यंतरी विजय-ममता सिग्नलवरून टाकळीमार्गे औरंगाबाद रोड, आग्रा रोड आणि सातपूर, अंबड, मुंबईसाठी वडाळा गाव, इंदिरानगरमार्गे मुंबई रस्त्यावर वाहतूक वळविली गेली. मात्र वडाळा, इंदिरा नगर हा रहिवासी भाग असल्याने या भागात अवजड वाहतुकीचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. आता या मार्गावरील अवजड वाहतूक थांबविण्याच्या हालचाली सुरू असून ती बाब उद्योगाच्या दृष्टीने मारक ठरणार आहे. द्वारका-नाशिकरोड बहुमजली उड्डाण पूल प्रस्तावित आहे. हा पूल मुंबई-आग्रा महामार्गाला जोडल्यास वाहतूक कोंडी काही अंशी कमी होईल. नाशिकचे पालकत्व स्वीकारून ठोस उपाय करावेत, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी यांनी केली.

ट्रक टर्मिनसच्या जागांची पळवापळवी

अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनलसाठी राखीव जागा उद्योगांना दिली गेली. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विल्होळी नाक्यावरील जागेवर जलशुध्दीकरण केंद्र उभारल्याने ट्रक टर्मिनलला जागा राहिली नाही, चेहेडी नाका येथेही सुविधा उपलब्ध नाही. आडगाव ट्रक टर्मिनल अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. याबाबत तत्कालीन लोकप्रतिनिधींकडे वारंवार दाद मागितली गेली. अद्याप हे ट्रक टर्मिनल दुर्लक्षित आहे. त्यामुळे उद्योगांना कच्चा माल पुरविणाऱ्या वाहतूकदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने उद्योजक देखील वाहतूक सुविधा मिळत नसल्याने अडचणीत आहेत.

पूर्णवेळ अवजड वाहतुकीची गरज

शहरात काही वेळ अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे. वाहतूक क्षेत्रासह उद्योगासाठी ही अडचणीची बाब ठरेल. त्यामुळे शहरातून पूर्णवेळ अवजड वाहतूक सुरळीत सुरू ठेवावी. वाहतूकदारांसाठी शहराच्या चारही प्रवेशद्वारावर ट्रक टर्मिनल विकसित करावे. त्यातून वाहतुकीचे अडथळे दूर होऊन उद्योगांचा आणि त्यातून नाशिकचाही विकास साधला जाणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

उपाय काय ?

– उद्योगांना जोडणाऱ्या शहराच्या बाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्याची निर्मिती

– अतिक्रमण काढून शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण

– द्वारका चौकातील भुयारी मार्गाचा रिक्षा, दुचाकींसाठी वापर – शहराच्या वेशीवर सर्व महामार्गांवर ट्रक टर्मिनस