नाशिक – वाहतुकीच्या उपाययोजना न करताच शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला गेल्यास तो वाहतूक क्षेत्रासोबतच उद्योग क्षेत्रासाठी अन्यायकारक ठरेल. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अवजड वाहतूक बंद करणे हा पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे एकतर्फी अवजड वाहनांची वाहतूक बंद केल्यास याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा नाशिक जिल्हा वाहतूकदार संघटनेने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक : उपनिबंधक कार्यालये लवकरच आरामदायक ; क्रेडाई कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यात राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन

शासनाने प्रथम वाहतुकीच्या उपाययोजना कराव्यात, मालमोटार टर्मिनसचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसह प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाहतुकीच्या प्रश्नांमुळे अवजड वाहतुकीस बंदी घालण्याची चर्चा होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी शहराच्या चारही दिशांना आणि औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनल विकसित करावे, अशी वारंवार मागणी वाहतूकदार संघटना करीत आहे. वाहतुकीचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने वळण रस्ता विकसित करून आहे त्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज आहे. असे उपाय न करता शासकीय यंत्रणेकडून अवजड वाहतूक बंद करण्याची चर्चा नाशिकच्या विकासाला खीळ घालणारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> नाशिक : २५२ जागांसाठी २४२० अर्ज, १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक, आज छाननी

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नाशिक वाहतूकदरा संघटनेकडून वाहतूक बेटांचा अभ्यास करण्यात आला. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत अनेक महत्वपूर्ण अशा उपाय योजना विद्यार्थ्यांनी सुचविल्या आहेत. स्पर्धेत अनेक तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला. त्यांनीही विद्यार्थ्यांनी सुचविलेल्या उपाय योजना प्रभावी असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने त्या अंमलात आणल्या तर वाहतुकीचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यामुळे त्या उपाययोजना स्वीकाराव्यात, असे साकडे घालण्यात आले. संघटना सामाजिक बांधिलकी जपत नाशिकच्या विकासात योगदान देत आहे. परंतु, प्रशासनाकडून नेहमीच वाहतूकदारांच्या विरोधात भूमिका घेण्यात आली आहे. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने प्रशासनाची भूमिका चुकीची आहे. प्रथम वाहतुकीच्या उपाय योजना कराव्यात, संघटनेच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा अन्यथा संघटनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transporter union warning of agitation if heavy vehicle ban without traffic planing in nashik city zws
Show comments