नाशिक – मंगळवारी वृक्षप्रेमी आणि राजकीय मंडळी यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद उमटत असतांना या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिका वृक्ष प्राधिकरण विभागाने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. स्थानिकांचा विरोध पाहता संबंधित वृक्ष पुनर्रोपणाचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने देण्यात येणार आहे. आयुक्तांच्या निर्णयानंतर या संदर्भातील कारवाई करण्यात येईल.

शहरातील गंगापूर रस्त्यावरील प्राचीन वटवृक्ष वाचविण्यासाठी जमलेल्या पर्यावरणप्रेमींना मंगळवारी सकाळी सुनावणीसाठी जमलेल्या एका गटाने मारहाण केली. अकस्मात घडलेल्या या घटनेने धास्तावलेल्या वृक्षप्रेमींनी पोलिसात धाव घेतली. वृक्षप्रेमींनी मद्यपान करून वाहन चालविले जात असल्याने अपघात घडतात, असे विधान केल्यामुळे स्थानिक रहिवासी चिडले. वृक्ष हटविण्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात बाचाबाची होऊन वाद झाले.

हेही वाचा >>> वटवृक्षाविषयी वादाची आदित्य ठाकरेंकडून दखल, मारहाणीची वृक्षप्रेमींकडून तक्रार

गंगापूर रस्त्याच्या मध्यभागी तसेच लगत काही वृक्ष आहेत. या वृक्षांना धडक बसून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. न्यायालयाने स्थानिकांचे म्हणणे जाणून रस्त्यातील झाडांबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने रस्त्यातील वटवृक्षाबाबत नागरिकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी मंगळवारी हरकती व सूचना मांडण्याचे आवाहन केले होते. वाढत्या अपघातामुळे काही सामाजिक संस्था, पोलीस आणि स्थानिक रहिवाशांनी त्यांचे पुनर्रोपण करण्याची आवश्यकता मांडली. त्या अनुषंगाने पाहणी होत असतांना दोन्ही गटात वाद झाले. दरम्यान, या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आनंद रॉय यांनी विलास शिंदे, त्यांचे कार्यकर्ते यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. वृक्षप्रेमींनी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याविषयी कामकाज चालु असतांना संबंधित विभाग हस्तक्षेप का करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. याविषयी वृक्ष प्राधिकरणाचे विवेक भदाणे यांनी माहिती दिली. प्राधिकरण न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचे वृक्षप्रेमींना वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी. वास्तविक मंगळवारी भोसला सर्कल ते बापू पूल या संबंधित पाहणी होती. गंगापूर रोड विषय वेगळा आहे. वृक्षप्रेमी चुकीची माहिती देत सर्वांची दिशाभूल करीत आहेत. सातपूरमध्येही अशाच पध्दतीने विरोध झाला. महापालिकेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे वृक्षप्रेमींनी अपघातात गेलेल्या व्यक्तींनी मद्यपान केले असल्याचे म्हटले. यावरून संबंधित नागरिक अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. स्थानिकांचा विरोध असून झाडे प्रत्यारोपणास त्यांची संमती आहे. त्यानुसार आयुक्तांकडे प्रस्ताव देण्यात येणार असून त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे भदाणे यांनी नमूद केले.