पालथ्या घडय़ावर पाणी..
‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिकेसह खासगी संस्था व कारखाने प्रयत्नशील असले तरी त्यातील काही प्रयत्न नियोजनशून्य कारभारामुळे ‘पालथ्या घडय़ावर पाणी’ असे ठरत आहे. उड्डाणपुलाखालच्या जागेत लावली जाणारी झाडे, हे त्याचे ठळक उदाहरण. एका खासगी कंपनीच्या सहकार्याने दर काही महिन्यांनी या ठिकाणी वाढलेली झाडे लावली जातात. सूर्यप्रकाश न मिळाल्याने कालांतराने ती सुकतात. पुन्हा नव्याने हाच कित्ता गिरविला जातो. एक ते दीड वर्षांपासून पुन्हा पुन्हा झाडे लावली जात असली तरी पुलाखाली हिरवळ काही फुललेली नाही. उड्डाणपुलाच्या खालील भागात झाडे जगण्याची फारशी शाश्वती नाही. त्याचा विचार न करता हा ‘शेखचिल्ली’ उद्योग केला जात असल्याने स्थानिकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत.
पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यासाठी महापालिका खासगी संस्था आणि कंपन्यांच्या मदतीने विविध उपक्रम राबवते. त्या अंतर्गत वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, पदपथालगतच्या मोकळ्या जागा, रस्ते दुभाजकातील जागा या ठिकाणी शोभिवंत झाडांची लागवड, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले जातात. शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जवळपास सहा किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल साकारण्यात आला. या उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत काही ठिकाणी वृक्षारोपणाची करामत केली जात आहे. औरंगाबाद नाका ते आडगांव नाका परिसरात पुलाखालील परिसर चांगला दिसावा म्हणून वाढलेली झाडे लावली जातात. पाच ते सहा फूट इतक्या उंचीची ही झाडे आहेत. कोणत्याही झाडाच्या नैसर्गिक वाढीसाठी सूर्यप्रकाश हा सर्वात महत्त्वाचा घटक. या ठिकाणी त्याची उणीव असूनही हा प्रयोग अविरतपणे सुरू आहे. दरवेळी लागवड केलेली झाडे सूर्यप्रकाश न मिळाल्याने तीन ते चार महिन्यांत मृतप्राय होतात. मग, ही झाडे काढून नवीन त्यासारखीच उंचीची झाडे पुन्हा लावली जातात. पैशांची उधळपट्टी करण्यासाठी झाडे लावण्याचा सपाटा सुरू असल्याची स्थानिकांची भावना झाली आहे. कारण, लागवड केलेली ही झाडे काही महिन्यांत पुन्हा ओसाड किंवा जळालेली दिसून येतात.
या संदर्भात पर्यावरणप्रेमी वसुधा फाळके यांनी झाडे लावायलाच हवी, पण ती का जगत नाहीत, याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुळात उड्डाणपुलाखालच्या जागेवर मातीचा थर दिसत असला तरी त्या ठिकाणी दगड, सिमेंट किंवा तत्सम साहित्याचा खच आहे.
अशा परिस्थितीत झाडे कशी जगतील, याची तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच, ही झाडे कोणाकडुन चोरली जात नाहीत ना, याकडे लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी महापालिका झाडे लावताना ॠतुमान किंवा जागेचा कोणत्याही अभ्यास करत नसल्याचे सांगितले. केवळ झाडे लावण्याची तत्परता दाखविली जाते. वास्तविक महामार्गाच्या कडेला तसेच दुभाजकांच्या मध्ये कोणती झाडे लावावी, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. महामार्गाच्या कडेला वड, पिंपळ, उंबर ही प्राणवायू जास्त प्रमाणात देणारी झाडे लावण्यात यावी. तसेच देशी आंबा, कुसुम, रक्तचंदन, शिवणचा वापरही व्हावा, जेणेकरून हवेत गारवा राहील व दाट सावली मिळेल.
दुभाजकात निवडुंग, शेर, अॅगीयो ही शोभेची झाडे लावता येतील. त्यामुळे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड शोषून प्राणवायू जास्तीतजास्त देणाऱ्या झाडांचा विचार व्हायला हवा. झाडे लावली पाहिजे. त्यांना वेळेच्या वेळी पाणी दिले पाहिजे असे मत प्रा. बोरा यांनी व्यक्त केले.