नाशिक; सिडकोतील आयटीआय पूल ते वावरे नगर दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणास अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची तोड करण्यास मंगळवारी सातपूर विभागीय कार्यालयात आयोजित हरकतींवरील सुनावणीवेळी वृक्षप्रेमींनी विरोध केला. त्याचवेळी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी विकासासाठी वृक्षतोडीस पाठिंबा दर्शविला. दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद झाल्याने पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला.
वृक्षतोडीस पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध दर्शवून महापालिकेकडे हरकत नोंदवत तोड थांबवण्याची मागणी केली होती. वृक्षप्रेमींच्या हरकतींवर मंगळवारी सातपूर विभागीय कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान अमित कुलकर्णी आणि सुमित शर्मा यांच्यासह इतरांनी वृक्षतोडीविरोधात ठाम भूमिका घेतली. परंतु, काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी झाडे तोडण्याच्या निर्णयाचे समर्थन करत नागरिकांना आपल्या बाजूने उभे केले. यामुळे दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद झाला, वाद एका पदाधिकाऱ्याने वृक्षप्रेमींना धमकी देण्यापर्यंत विकोपाला गेला. वृक्षतोड समर्थक आणि विरोधक यांच्यातील वाढत्या तणावामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. काही वेळ परिसरातील वाहतूकही विस्कळीत झाली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वृक्षप्रेमींना यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. वृक्षतोडीला कडाडून विरोध करणाऱ्यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.
वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या एकूण २२ हरकती प्राप्त झाल्या. त्याचवेळी वृक्षतोडीच्या समर्थनार्थही परिसरातील नागरिक आले होते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. सदर अहवाल मनपा अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ते जागेवर येऊन पाहणी करतील. त्यानंतर यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल. शक्यतो वृक्ष वाचावेत हीच आमची भूमिका असेल.-भविष्या निकम (उद्यान अधिकारी, सातपूर)
सुनावणी दरम्यान वृक्षप्रेमींवर दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी एका विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्याने परिसरातील त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणले होते. हरकती घेतलेल्या नसलेल्यांनाही मनपामध्ये बळजबरीने प्रवेश देण्यात आला होता. काहींनी माझ्याशी हुज्जत घातली. कुठल्याही प्रकारे वृक्षतोड होऊ देणार नाही- सुमित शर्मा (वृक्षप्रेमी)
त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल दरम्यान उड्डाणपूल करताना अनेक वृक्षांची तोड होणार होती. त्यास वृक्षप्रेमींनी विरोध केल्यावर उड्डाणपूल रद्द झाला. शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) नेते सुधाकर बडगुजर यांनी वृक्षप्रेमींवर कधीच दबावतंत्राचा वापर केला नाही. परंतु, या ठिकाणी आमच्यावर सत्ताधाऱ्यांकडून धमकी व दबावतंत्राचा वापर झाला.- अमित कुलकर्णी (वृक्षप्रेमी)
विकास कामांसाठी वृक्षतोड होणे आवश्यक आहे. काही वृक्षांना कीड लागली आहे. ती केव्हाही पडू शकतात. खोदकामामुळे झाडांच्या मुळ्या देखील बाहेर आल्या आहेत. रस्त्याचे काम थांबल्यास पावसाळ्यात यापैकी अनेक झाडे पडू शकतात. यापूर्वी झाड पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.- सुधाकर जाधव (उपमहानगर प्रमुख, शिवसेना)