उधारीत वाढ, अर्थचक्र ठप्प
चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता
नाशिक : जिल्ह्य़ात पावसाने दमदार हजेरी लावली असून शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. टाळेबंदी आणि करोनाचे संकट घोंघावत असताना आदिवासीबहुल परिसरात मात्र शेतमजुरांवर घासभर अन्नासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने आणि अर्थचक्र थांबल्याने मुलांचे शिक्षण, दैनंदिन व्यवहार यांसह सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
जिल्ह्य़ात यंदा पावसाने उशिराने हजेरी लावली असली तरी आदिवासीबहुल परिसरात त्यानंतर चांगला पाऊस झाला. पावसाच्या पाण्यावर या परिसरातील शेती अवलंबून असल्याने शेतीकामांनी वेग घेतला. तसेच या परिसरात धबधबे, झरे खळाळून वाहत असताना शिथिलीकरणाच्या प्रक्रि येत पर्यटकांचा ओघही वाढला आहे. वरकरणी सारे काही आलबेल दिसत असताना आदिवासी पाडय़ांवर, वस्तीवर मात्र शेतमजुरांना हाताला काम नसल्याने हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे. करोनाचा विळखा ग्रामीण भागात घट्ट बसत असताना अनेकांनी शेतीवर येणाऱ्या मजुरांना काम नाकारले आहे. पावसाळ्याच्या दिवसात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांना करोना आणि टाळेबंदीमुळे नव्याने कामधंदा शोधण्याची वेळ आली आहे.
गावात किंवा जवळपासच्या भागात रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्र्यंबक, हरसूल, पेठ, सुरगाणा आदी भागातून शेतमजुरांचे जथे उधार पैसे घेत शहरात येतात. नाशिक शहराच्या नाक्यावर, चौफु लीवर कामाच्या प्रतीक्षेत थांबून राहतात. काही काम मिळाले तर ठीक, अन्यथा कधी कधी त्यांना पायीच परतीचा प्रवास करावा लागतो.
त्र्यंबके श्वर तालुक्यातील वावी हर्ष परिसरातील यशवंत बांगारे यांनी त्यांचे म्हणणे मांडले. काही दिवस शहरात काम मिळते का पाहिले. परंतु भाडय़ापुरतेही पैसे मिळत नसल्याने अखेर गावात तसेच जवळच्या शेत परिसरातील बांधावर जात वाढलेले गवत काढण्याचे काम करत आहे. पत्नी संगीता आणि दोन मुलींसोबत सकाळी आठ वाजेपासून गवत कापण्यास सुरुवात करतो. दिवसातून एकदा गाडी शहराच्या दिशेने जाते. त्यात गवताच्या पेंडय़ा टाकायच्या. एका पेंडीसाठी दीड रुपया, तर १०० पेंडय़ा केल्या की १५० रुपये मिळतात. कधी कधी गाडीत जागा नसते तर कधी गाडीच येत नाही.
त्या दिवशी कापलेले गवत फे कू न द्यावे लागते. कारण पावसामुळे ते सडते किं वा उन्हामुळे करपते. असे गवत कोणी घेत नसल्याने त्या दिवसाची मेहनत वाया जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त के ली.
सखुबाई गोहिरे यांनी सहा महिन्यांपासून पतीला काम नसल्याचे सांगितले. तो गावोगाव काम शोधत फिरतोय. मी आणि माझी मुले सध्या शाळा बंद असल्याने गवत कापण्याचे काम करतो. आमच्याकडे भ्रमणध्वनी नाही.
मुलांचे शिक्षण थांबले आहे. पोरांचा हातभार कामाला लागतोय म्हणून महिन्यातील काही दिवसांच्या जेवणाचा प्रश्न सुटतोय. उधारी वाढते, पण पर्याय नाही, अशी हतबलता गोहिरे यांनी व्यक्त के ली.