नाशिक विभागीय शालेय आदिवासी क्रीडा स्पर्धा
विभागीय शालेय आदिवासी क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो या सांघिक खेळांसह वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्येही सुरेख सुरुवात करत नंदुरबार प्रकल्पाने ठसा उमटविला. येथील विभागीय क्रीडा संकुलात रविवारी स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. जे. पी. गावित, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, किसन तडवी, आदिवासी विकास आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर, माजी आमदार शिवराम झोले, नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त अशोक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. एक डिसेंबपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेत नाशिक, कळवण, नंदुरबार, धुळे, तळोदा, यावल व राजूर या सात प्रकल्पातील सुमारे २३०० खेळाडू सहभागी झाले आहेत. १४ वर्षांआतील गटात कबड्डीमध्ये तळोदा, यावल, राजूर, मुलींमध्ये राजूर, नाशिक, धुळे तर १७ वर्षांआतील गटात नंदुरबारच्या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली. १९ वर्षांआतील गटात कळवण, यावल, तळोदा प्रकल्पाच्या मुलींनी आपले पहिले सामने जिंकले. व्हॉलीबॉलमध्ये नंदुरबारच्या मुलींनी १४ वर्षांआतील गटात तसेच १७ वर्षांआतील गटात मुलांनी यश मिळविले. जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, विलास पाटील, प्रशांत भाबड, प्रा. कैलास लवांड, दिनेश जाधव आदी यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा