नाशिक : प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्याने एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने सोमवारी पुन्हा एकदा पाणी प्रश्नावर त्र्यंबकेश्वर येथील पंचायत समिती कार्यालयात ठिय्या देण्यात आला. जाेपर्यंत वाडीवर टँकर येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला.

जलजीवन मिशन योजनेची अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करून सर्व वाड्या-पाड्यांवर नळ पाणीपुरवठा योजना सुरू करून निकृष्ट दर्जाच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांची चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी महिला दिनी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी संबंधित गट विकास अधिकाऱ्यांना टंचाई असलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्याला महिना होऊनही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आदिवासी भागातील नळ पाणीपुरवठ्याची सोय नसलेल्या आदिवासी गाव, पाडे, वाड्या यांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करून प्रत्येक घरात नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करणे, वीज पुरवठा नसलेल्या आदिवासी पाड्यांवर सौर ऊर्जा आधारित नळ पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे होते. मात्र अजूनही अनेक अंगणवाडी, शाळांना पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी विश्वासात न घेता कामे केली असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात जलजीवन मिशनची अनेक कामे अपूर्ण आहेत. सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, पुढील देयके देऊ नयेत, अशी मागणी संघटनेने अनेकदा केली आहे. अनेकदा रास्ता रोको, ग्राम पंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात आला. परंतु, दखल घेण्यात आलेली नाही.

जल जीवन योजनेच्या अपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, जल जीवन योजनेच्या सर्व कामांचे सामाजिक लेखा परीक्षण करावे यांसह तळेगाव, टाके देवगाव, मुळेगाव, चंद्राचे मेट, देवगाव या ठिकाणी तत्काळ टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.