धुळे – मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचार, हिंसाचारामुळे राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी, आरोपींना फाशी द्यावी, या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी क्रांती सेनेसह समविचारी संघटनांतर्फे गुरुवारी ‘आदिवासी भिल्ल जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टांडळाने दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे.
हेही वाचा >>> जळगाव पालिकेतील घडामोडींमध्ये मंत्र्यांचा हस्तक्षेप
मणिपूरमध्ये काही दिवसांपासून महिलांवर अत्याचार सुरु असून सरकार या घटनांची दखल घेत नाही. त्यामुळे आता सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागु करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये अत्याचार सुरू असतानाही सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे. एरंडोल तालुक्यातील खडके येथील आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, वसतिगृहातील घटनेची सखोल चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष भरत जाधव, प्रदेशाध्यक्ष रंगनाथ ठाकरे, उपाध्यक्ष दौलत अहिरे, सचिव लक्ष्मण पवार, अनिल अहिरे, कार्याध्यक्ष महेंद्र माळी आदींची स्वाक्षरी आहे.