मुंबईतील हाजी अली दग्र्यात महिलांना प्रवेश देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे मंदिर-दर्गातील महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिकांशी संघर्ष करत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या तृप्ती देसाई व वनिता गुट्टे या महिलानंतर मागील साडे तीन महिन्यांत एकाही महिलेने या ठिकाणी प्रवेश केलेला नाही. महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश करणे तर दूरच, पण या काळात कोणी तशी साधी इच्छा देखील प्रदर्शित केलेली नाही. महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा निव्वळ आंदोलनामुळे चर्चेत राहिला असून आंदोलक वगळता उर्वरित महिला वर्गास त्यात स्वारस्य नसल्याचे दिसत आहे.
शनिशिंगणापूर मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी काही महिन्यांपूर्वी सुरू झालेले आंदोलन नंतर बारा ज्योतिलिर्ंगांपैकी एकअसलेले त्र्यंबकेश्वर मंदिर आणि पुढे नाशिकमधील कपालेश्वर मंदिरापर्यंत येऊन पोहोचले होते. न्यायालयाने महिलांच्या प्रवेशाचा हक्क मान्य केल्यामुळे या विषयावर लढणाऱ्या भूमाता ब्रिगेड आणि स्वराज्य महिला संघटना यांनी आक्रमकपणे प्रवेशासाठी धडपड सुरू केली. या घडामोडींमुळे त्र्यंबकेश्वरमधील वातावरण ढवळून निघाले होते. त्र्यंबकेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात महिलांच्या प्रवेशास स्थानिकांनी कडाडून विरोध केला. गाभाऱ्यात महिलांच्या प्रवेशावर र्निबध आहेत, पुरूष भाविकांनाही प्रवेश करावयाचा झाल्यास विशिष्ट नियमावली आहे. ओले वस्त्र परिधान करून त्यांना विशिष्ट वेळेत गाभाऱ्यात जाता येते. हे मुद्दे मांडून स्थानिकांनी महिलांच्या प्रवेशास कडाडून विरोध केला होता. यावरून त्र्यंबकेश्वरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अखेरीस २१ एप्रिल रोजी वनिता गुट्टे यांच्यासह चार महिला आणि नंतर काही दिवसांत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पोलीस बंदोबस्तात गाभाऱ्यात जाऊन त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. त्यावेळी बराच गोंधळ उडाला होता. संबंधित महिलांची अडवणूक व मारहाणप्रकरणी ग्रामस्थांवर गुन्हेही दाखल झाले होते.
उपरोक्त महिलांनी नियमावलीचे पालन करत प्रवेश केला. त्यानंतर त्र्यंबक मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश घेण्यासाठी इतर महिला पुढे येतील, असे चित्र होते. परंतु, तसे काहीच घडले नाही. मंदिर देवस्थानच्या नियमानुसार सकाळी पाच ते सहा या कालावधीत नियमावलीचे पालन करून कोणत्याही भाविकाला गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येते. परंतु, मागील साडे तीन महिन्यात एकही महिला गाभाऱ्यात गेली नाही अथवा कोणी तशी इच्छाही व्यक्त केली नसल्याचे मंदिराचे त्रिकालपूजक तथा विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी सांगितले. प्रवेशासाठी धडपडणाऱ्या महिलांनी निव्वळ प्रसिद्धीसाठी तेव्हा ‘स्टंटबाजी’ केल्याची स्थानिकांची भावना आहे.
दरम्यान, कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी तृप्ती देसाई यांनी केलेले आंदोलन बरेच गाजले होते. या गाभाऱ्यात पूजारींव्यतिरिक्त कोणी जाऊ शकत नसल्याचे कारण पुढे करत त्यांना कडाडून विरोध झाला. अखेरीस भाविक जिथून दर्शन घेतात, तिथून दर्शन घेऊन देसाई यांना पोलिसांनी पुण्याला रवाना केले. देसाई यांच्या आंदोलनानंतर कोणत्याही महिलेने गाभाऱ्यात प्रवेश करण्याची मागणी केली नसल्याचे कपालेश्वर मंदिराचे पूजाधिकारी देवांग जानी यांनी सांगितले.