नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वरसाठी तयार केलेल्या आराखड्यातील २७५ कोटींच्या विविध विकास कामांना कामांना तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत उच्चस्तरीय बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली दरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. यावेळी विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दीड महिन्यापूर्वी त्र्यंबकेश्वरला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. कुंभमेळ्यासाठी नगरपालिकेने सुमारे ११५० कोटींचा आराखडा तयार केला आहे. यातील सुमारे २७५ कोटींची कामे तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत करण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले. उर्वरित कामे संबंधित विभागांच्या योजनेत समाविष्ट करावीत, असे सूचित करण्यात आले.
कुंभमेळा आराखड्यात दर्शन पथ, नवीन रस्त्यांचे बांधकाम, घाटांचे नुतनीकरण, स्वागत कमानी उभारणी, सुशोभिकरण, नदी संवर्धन, घनकचरा प्रकल्प उभारणी, त्र्यंबकेश्वर वाढीव पाणी पुरवठा योजना, वाहनतळ उभारणी आदी कामांचा समावेश आहे. यातील कोणती कामे तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट झाली, याची स्पष्टता बैठकीचे इतिवृत्त प्राप्त झाल्यानंतर होईल, असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले.
तीन एकर क्षेत्रात वाहनतळ प्रस्तावित आहे. या ठिकाणी काही दुकानांचे नियोजन आहे. ९० टक्के जागा वाहनतळासाठी वापरली जाईल, असे नियोजन करावे, असे सौनिक यांनी सूचित केले. दुकानांची संख्या वाढल्यास वाहनतळासाठी पुरेशी जागा मिळू शकणार नसल्याचा मुद्दा बैठकीत मांडला गेल्याचे सांगितले जाते.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग देण्यात आला आहे. बैठकांवर बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील विकास कामांविषयी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली दरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.