ओले सुती, रेशमी वस्त्र परिधान करण्याची सक्ती
त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश देण्यावरून सुरू असलेल्या वादावर देवस्थानने अखेर नमती भूमिका घेत महिलांना सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्दय़ावरून आंदोलन करणाऱ्या स्वराज्य महिला संघटनेने या निर्णयाचे स्वागत करत गुरुवारी सकाळी दर्शनासाठी गर्दी केली. तथापि, पुरोहित व स्थानिकांनी ओले सुती वा रेशमी वस्त्र परिधान न केल्याचे कारण दाखवत त्यांना गर्भगृहात प्रवेश नाकारला.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांनाही प्रवेश मिळावा, या मागणीसाठी काही महिला संघटना आक्रमक झाल्या होत्या. प्रारंभी देवस्थानच्या काही विश्वस्तांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले होते. पुढील काळात महिलांना प्रवेश देण्याचा प्रश्न नको म्हणून पुरूषांनाही प्रवेश बंद करण्यात आला. परंतु, त्याचे पडसाद उमटल्यावर तो निर्णय देवस्थानला मागे घ्यावा लागला. दरम्यानच्या काळात महिला संघटनांनी आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारल्यानंतर देवस्थानने गर्भगृहात महिलांना प्रवेश देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. परंतु, प्रत्यक्ष निर्णय घेतला नव्हता. याच मुद्दय़ावरून स्वराज्य महिला संघटनेने बुधवारी मंदिराच्या गाभाऱ्यात ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत विश्वस्त या मुद्यावर खल करत होते. अखेर देवस्थानने न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत पुरूषांप्रमाणे महिलांना सकाळी सहा ते सात या कालावधीत गर्भगृहात प्रवेश देण्यास मान्यता दिली. गर्भगृहात प्रवेश करताना ओले सुती, रेशमी वस्त्र परिधान करणे आवश्यक राहणार असल्याचे सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवेश नाकारल्याने धक्काबुक्की
* देवस्थानचा निर्णय समजल्यावर स्वराज्य संघटनेच्या काही महिलांनी
गर्भगृहात प्रवेशासाठी गर्दी केली
* मात्र पुरोहित, स्थानिकांनी ठरावीक गणवेशाची नियमावली बंधनकारक असल्याचे सांगत प्रवेश नाकारला
* यामुळे पुरोहित, महिला, नागरिक यांच्यात वाद झाले. या गदारोळात धक्काबुक्की झाली.
* गर्भगृहात प्रवेशाची वेळ निघून गेल्याने महिलांना प्रवेश करता आला नाही

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trimbakeshwar temple allows women to enter inner sanctum