नारायण नागबळी, कालसर्प शांती, त्रिपिंडी यासह पितृदोष निवारणासाठी करण्यात येणाऱ्या विशिष्ट पूजांचे एकमेव ठिकाण आणि बारा ज्योतिर्लिगापैकी एक असणारे त्र्यंबकेश्वर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात दोन पुरोहितांकडे मिळालेल्या कोटय़वधींच्या मालमत्तेने चर्चेत आले आहे. पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या आणि पौरोहित्यातून नवीन उद्योगांचे इमले रचणाऱ्या त्र्यंबकमधील पुरोहितांच्या गडगंज श्रीमंतीच्या सुरस कथा नेहमी सांगितल्या जातात. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईने पुरोहित वर्गात अस्वस्थता पसरली आहे.

देशात काही विशिष्ट पूजा विधींसाठी एकमेव ठिकाण म्हणून गणल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांच्या गर्भश्रीमंतीविषयी एरवीही बरीच चर्चा होते. नोटा बंदीच्या निर्णयानंतर देशात ज्या काही बऱ्यावाईट घडामोडी घडल्या, त्याचे प्रतिबिंब या नगरीतही उमटले. बँकेतील मोठय़ा आर्थिक उलाढाली पाहून प्राप्तिकर विभागाने त्र्यंबकेश्वरमधील दोन पुरोहितांच्या घरावर छापा टाकला. दोन दिवस चाललेल्या तपासणीअंती कोटय़वधीची मालमत्ता, सोने, शेती व इतर व्यवसायात केलेली गुंतवणूक असे मोठे घबाड पथकाच्या हाती लागले. त्यात बेनामी किती आणि करचोरी केलेले किती, याची यथावकाश तपासणी होईल पण त्यामुळे पुरोहितांच्या श्रीमंतीवर प्रकाश पडला आहे.

परंपरेने पिढीजात म्हणून ‘तीर्थ पुरोहित’ ही बिरुदावली मिरवणारी २०० घराणी या ठिकाणी असून अन्य १०० पुरोहित हे आपापल्या क्षमतेनुसार कालसर्प, नारायण नागबळी, त्रिपिंडीसह त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक, शिवपूजा, रुद्र पूजा करतात. याशिवाय प्रदोष पूजाही येथे होते. त्र्यंबकेश्वर येथील पूजेला विशेष महत्त्व असल्याचा प्रचार होत असल्याने देशासह परदेशातून भाविकांचा मोठा राबता असतो. भाविकांच्या गर्दीमुळे या नगरीत अनेक व्यवसाय बहरले. पूजा साहित्य, कापड, भोजनालय, निवासगृह हे व्यवहार भरभराटीला आले आहेत. नाशिकमधील सर्वसाधारण हॉटेलमध्ये नसतील इतका त्र्यंबकमध्ये निवासाचा खर्च आहे. पिढीजात पौरोहित्य करणाऱ्या कुटुंबाची नवीन पिढी या व्यवसायात रमण्याऐवजी अन्य व्यवसायांकडे लक्ष देत आहे. त्यातील काहींनी दुकाने, भोजनालय, बांधकाम आदी क्षेत्रांतही प्रवेश केला. काही विशिष्ट पूजेवेळी भाविक पुरोहितांच्या घरात निवास करतात. त्यामुळे भोजन व्यवस्थेचा जोडव्यवसाय मिळाला. या ठिकाणी तीर्थ पुरोहित बिरुदावली मिरवणाऱ्या पुरोहितांची विशिष्ट पूजा करण्यासाठी मक्तेदारी असली तरी अन्य काही मंडळी हे विधी करतात. या पूजा विधींचा खर्च भाविकाची क्षमता पाहून निश्चित होतो. पूजेसाठी दक्षिणा स्वरूपात घेण्यात येणारे पैसे हे भाविकांच्या आर्थिक क्षमतेवर तसेच प्रत्येक पुरोहितावर अवलंबून आहे. काही पूजांमध्ये सोने वा दागिन्यांची वस्तू दिली जाते. हे उत्पन्न कागदोपत्री नसल्याने त्याचा थांगपत्ता लागत नाही. पिढीजात पुरोहितांची ही श्रीमंती गावात फेरफटका मारल्यावरही लक्षात येते. प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांतून ते समोर आले आहे.

पूजेचे दर..

  • कालसर्प शांती : ८०० – २५०० रुपये (कालावधी तीन तास)
  • नारायण नागबळी : तीन दिवसांचा कालावधी – कमीत कमी २१०० ते प्रत्येकाच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे
  • त्रिपिंडी : ५००- २५०० रुपये (तीन ते चार तासांचा कालावधी)
  • अभिषेक : लघुरुद्र – ५१ – २५०० रुपये (आवर्तनावर कालावधी अवलंबून)

त्र्यंबकेश्वर येथे दोन दिवस चाललेल्या प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमुळे संपूर्ण पुरोहित वर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. काहींनी करभरणा केला नसेल, त्याची शिक्षा सर्वाना कशाला? असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सर्व पुरोहितांना एकत्रित करत त्यांना नियमित कर भरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच रोकडरहित व्यवहार कसे करावेत यासाठी कोणते पर्याय वापरावे, कर भरताना काही अडचणी असल्यास तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान लवकरच घेण्यात येणार आहे.

– प्रशांत गायधनी (त्र्यंबक पुरोहित संघ)

Story img Loader