विश्वस्त, पुरोहित, ग्रामस्थांसह २५० जणांविरुद्ध कारवाई; वाईट वागणूक मिळाल्याची आंदोलक महिलांची तक्रार
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाकारून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी देवस्थानचे विश्वस्त, पुरोहित, नगरसेवक आणि ग्रामस्थ अशा सुमारे २५० जणांविरुध्द गुन्हा गुरूवारी रात्री दाखल करण्यात आला आहे. मंदिरात महिलांना प्रवेश नाकारल्यावरून दाखल झालेला हा राज्यातील पहिलाच गुन्हा होय.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यावरून पुण्याच्या स्वराज्य संघटनेने आंदोलन सुरू केल्यावर देवस्थानने नमते घेत महिलांना सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, जेव्हा प्रत्यक्षात प्रवेश देण्याची वेळ आली तेव्हा ओले सुती वस्त्र परिधान न केल्याचे कारण सांगत प्रवेश नाकारला. या वेळी देवस्थानचे विश्वस्त, पुरोहित, नगरसेवक व ग्रामस्थांच्या जमावाने स्वराज्य संघटनेच्या महिलांना शिवीगाळ व धक्काबुक्की करत मंदिराबाहेर काढले. मंदिर परिसरात उभे राहण्यास त्यांना मनाई करण्यात आली. मंदिराबाहेरील काही हॉटेलमधून या आंदोलक महिलांना चहा व पाणी विकत दिले गेले नाही. एका हॉटेलने ते दिले, पण संबंधित चालकाने त्यापोटी दिलेले पैसे महिलांच्या तोंडावर फेकल्याचे संघटनेच्या प्रमुख वनिता गुट्टे यांनी सांगितले. या वेळी मंदिर परिसरात भाविकांसाठी असणारे सार्वजनिक प्रसाधनगृह बंद करण्यात आले. गावातील बहुतेकांनी अवमानास्पद वागणूक दिल्याचे महिलांनी तक्रारीत म्हटले आहे. मंदिरात प्रवेश देण्याची तयारी दर्शवत नंतर तो नाकारून देवस्थानने फसवणूक केल्याचा आरोप गुट्टे यांनी केला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सुमारे २५० जणांविरुध्द महाराष्ट्र हिंदू सार्वजनिक प्रार्थनास्थळे प्रवेश कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा