नाशिक – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर बुधवारी पहाटे चारपासून गुरूवारी रात्री नऊपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. त्यासाठी पूर्व दरवाजा दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांची होणारी गर्दी पाहता देवस्थानच्या वतीने ऑनलाईन दर्शन, देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले असून थेट दर्शन सुरू राहणार आहे.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाशिवरात्र काळात भाविकांची होणारी गर्दी पाहता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. या काळात देणगी दर्शनही बंद राहणार आहे. देवस्थानच्या वतीने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचे सभागृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
महाशिवरात्र उत्सव २०२५ च्या अनुषंगाने मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या सोहळ्यानुसार यावर्षी देखील २५ फेब्रुवारी रोजी हळदीचा समारंभ होणार आहे. त्याअनुषंगाने मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात येईल. मंगळवारी सायंकाळी सातपासून रात्री नऊपर्यंत बासरी प्रशिक्षण वर्गाचा बासरी वादन कार्यक्रम होईल. परंपरेनुसार बुधवारी दुपारी तीन वाजता श्रीत्र्यंबक राजाची पालखी मंदिरातून निघेल. सकाळी देवस्थानमध्ये लघुरुद्र तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम होतील. नियोजित मार्गावरून पालखी पुन्हा देवस्थानमध्ये येईल. या दरम्यान शिव तांडव ग्रुपतर्फे नृत्याचे सादरीकरण मंदिरासमोर तसेच मुख्य दोन चौकांमध्ये करण्यात येणार आहे. सायंकाळी आठ वाजता नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणनस्तु नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार सादर करणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नटराज अकॅडमीचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दरम्यान, पोलिसांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बससेवेचे नियोजन सुरू आहे.
नृत्यासह सांस्कृतिक कार्यक्रम
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. मंगळवारी सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत बासरी वादन, बुधवारी शिव तांडव ग्रुपतर्फे नृत्य, सायंकाळी आठ वाजता नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणनस्तु नृत्य अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार सादर करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी नटराज अकॅडमीचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
महाशिवरात्रीनिमित्त जादा बससेवा राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वतीर्थ टाकेद, कावनई, त्र्यंबकेश्वर, सोमेश्वर, दोधेश्वर, कपालेश्वर, शिरसमणी, पारेगाव आणि नागापूर येथे २५ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस बुधवार असून त्यामुळे महामंडळाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर ४५, भगूर-टाकेद २०, इगतपुरी -कावनई तीन, घोटी-टाकेद १४, इगतपुरी- टाकेद पाच याप्रमाणे जादा बससेवेचे नियोजन आहे.