त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्यावरून स्वराज्य महिला संघटना आणि मंदिर प्रशासनासह स्थानिकांमध्ये बुधवारी हातघाई झाल्यानंतर दोन्ही बाजुंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. ग्रामस्थ, देवस्थान समितीमधील काही मंडळींचा विरोध, पोलिसांची बघ्याची भूमिका यामुळे आंदोलकांना मारहाण झाल्याचा आरोप स्वराज्य संघटनेकडून करण्यात येत आहे. देवस्थानच्या विश्वस्तांनी मात्र हा अस्मितेचा मुद्दा असल्याचे सांगत विश्वस्त ग्रामस्थांसोबत असल्याचे नमूद केले. विश्वस्तांवर करण्यात आलेले आरोपही त्यांनी फेटाळून लावले. यापुढे आंदोलन अधिक तीव्र करत मंदिर प्रवेश करणारच, असा निर्धार संघटनेच्या प्रमुख विनीता गुट्टे यांनी व्यक्त केला आहे.
आंदोलनकर्त्यां महिलांना ग्रामस्थांनी चोप देत जबरदस्तीने मंदिर परिसरातून बाहेर काढल्या प्रकरणी माजी नगराध्यक्षांसह १५० ग्रामस्थांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी सायंकाळी उशीरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. स्वराज्य महिला संघटनेच्या वतीने आतापर्यंत दोन वेळा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन्ही वेळेस त्यांना स्थानिकांच्या विरोधामुळे गर्भगृहात प्रवेश करता आला नाही. मंगळवारी सायंकाळी देवस्थान समितीला कुठलीही पूर्वसुचना न देता स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा वनिता गुट्टे आणि कार्यकर्त्यां त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाल्या.
मंदिरात दर्शनाची वेळ संपल्याचे कारण सांगत संबंधित महिलांना मंदिर प्रवेशापासुन रोखण्यात आले. बुधवारी सकाळी देवस्थान समितीच्या अटी-शर्तीप्रमाणे सकाळी सहाआधी दर्शनासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यां आल्या. परंतु, यावेळी काही विश्वस्त आणि ग्रामस्थांनी गनिमी कावा करत आपणास प्रवेशापासून रोखल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आपल्याआधीच काही महिलांना रांगेत उभे करून थोडय़ा वेळाने दर्शनाची वेळ संपल्याचे सांगत आपणास बाहेर पडण्यास बजावण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ग्रामस्थांनी आपणास रोखत अंगावर काचेची बारीक पूड टाकण्यात आली. पुरूष मंडळीकडून शिवीगाळ व मारहाणही करण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
गर्भगृह प्रवेशाची वेळ टळल्याचे सांगत आंदोलकांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. हा प्रकार घडत असताना पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे सर्व प्रकाराचा जाब विचारण्यासाठी संघटनेच्या महिलांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. आपली तक्रार नोंदवून घेऊन मंदिरात जाण्यापासून रोखणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

त्र्यंबक गर्भगृहात महिलांना प्रवेशाविषयी देवस्थानची भूमिका स्पष्ट आहे. महिलांना प्रवेश दिला जाईल, मात्र अटीशर्तीवर. महिलांचा गर्भगृहातील प्रवेश हा त्र्यंबकवासियांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्याविषयी देवस्थान काहीही करू शकत नाही. आम्ही विश्वस्त असलो तरी त्र्यंबकचे रहिवासी आहोत. याबाबत काही ठाम भूमिका घेतल्यास जनतेचा रोष ओढवू शकतो. आंदोलनकर्त्यां महिलांनी संयम ठेवावा. तसेच पोलीस प्रशासनानेच योग्य पध्दतीने हे प्रकरण हाताळावे
– डॉ. सत्यप्रिय शुक्ल (विश्वस्त)

विश्वस्त किंवा देवस्थान यांचा आम्हाला मंदिरात प्रवेश करू देण्याचा इरादा नाही. केवळ शब्द, आश्वासनातून आमची फसवणूक केली जात आहे. दोषींना अटक तसेच मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केल्याशिवाय त्र्यंबकमधून परतणार नाही
-विनीता गुट्टे (अध्यक्षा, स्वराज्य महिला संघटना)

Story img Loader