लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. प्रसाधनगृह व सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था नाही. उद्योजकांना उद्योगाप्रमाणे मालमत्ता कर लागू होण्याची गरज आहे. अपुऱ्या सुविधांमुळे उद्योजकांचे हाल होत असल्याचा विषय महानगरपालिकेतील बैठकीत आमदार सत्यजित तांबे यांनी मांडला. उद्योजकांचे प्रश्न ठराविक कालमर्यादेत सोडविण्याची सूचना त्यांनी केली.
आणखी वाचा-नाशिक जिल्ह्यात ११ लाख स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम, ग्राहकांपेक्षा वीज कर्मचाऱ्यांना अधिक लाभ
अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या प्रश्नांवर तांबे यांनी पालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. यावेळी मनपा आयुक्त अशोक करंजकर, एमआयडीसीचे अधिकारी नितीन गवळी, नितीन पाटील, आयमाचे निखिल पांचाळ, मनीष रावल, निमाचे राजेंद्र आहिरे, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र पानसरे उपस्थित होते. बेरोजगारीचा प्रश्न गहन बनला आहे. रोजगार निर्मितीत उद्योजक मोलाची भूमिका बजावतात. नाशिकसह इतर निमशहरी भागांमध्ये त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. उद्योजक हेच रोजगार निर्माते असल्याने त्यांचे सर्व प्रश्न , समस्या ठराविक कालमर्यादेत सोडवा, अशी मागणी आम्ही केली. महापालिका आयुक्तांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.