१५ दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलनाचा तृप्ती देसाई यांचा इशारा
महाशिवरात्रीला नारायणगाव येथे रवानगी केलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा त्र्यंबकेश्वरकडे जाण्याचा केलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे येथे त्यांना अडविण्यात आले. त्र्यंबकेश्वर देवस्थानने १५ दिवसात मंदिर प्रवेशाबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन केले जाईल, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
शनि शिंगणापूर येथील शनीदेवाच्या चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाता ब्रिगेडने महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा इशारा दिल्यामुळे या दिवशी बराच गोंधळ झाला. त्यांना रोखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक महिलांनी त्र्यंबकमध्ये ठिय्या दिला होता. नाशिक-पुणे महामार्गावर सोमवारी सायंकाळी देसाइसह ब्रिगेडच्या इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढे जाण्यास मज्जाव केला. त्या सर्वाना रात्री नारायणगाव येथे सोडण्यात आले. ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्य़ाच्या हद्दीबाहेर सोडल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकणाऱ्या नाशिक पोलिसांसमोर मंगळवारी सकाळी पुन्हा धावपळ करण्याची वेळ आली.
देसाई या पाच ते सहा कार्यकर्तीबरोबर पुन्हा माघारी आल्याचे नांदूर शिंगोटे येथे पोलिसांच्या निदर्शनास आले. देसाई यांची टेम्पो ट्रॅव्हलर रोखण्यात आली. संबंधितांचा त्र्यंबकेश्वरकडे जाण्याचा आग्रह कायम होता. परंतु, पोलिसांनी त्यास आक्षेप घेऊन त्यांना अडवून ठेवले.
सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत त्यांना नांदूर शिंगोटे येथे बसवून ठेवण्यात आले. ही माहिती समजल्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील वातावरणही बदलले. स्थानिक महिलांनी पुन्हा एकत्र येत ब्रिगेडच्या एकाही कार्यकर्त्यांस मंदिरात जाऊ न देण्याची भूमिका घेतली. प्रशासनाने १५ दिवसात याप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यावर देसाई या पुण्याकडे रवाना झाल्या.
त्र्यंबकेश्वर देवस्थान समितीने महिलांना गर्भगृहात प्रवेश देण्याबाबत १५ दिवसात निर्णय न घेतल्यास पूर्वकल्पना न देता आंदोलन करण्याचा इशारा देसाई यांनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा