नाशिक: अमली पदार्थ माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे येथील ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची सखोल चौकशी व्हावी. या प्रकरणात लवकरच सत्य बाहेर येईल. यामध्ये जर कोणाचे नाव येत असेल तर राग येण्याचे कारण नाही, असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांचा उल्लेख टाळत हाणला.
शिवसेना उबाठा गटाच्या वतीने महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. या अंतर्गत नाशिक येथे आलेल्या अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ललित पाटील प्रकरणानंतर नाशिक हिंदू सकल समाज या संस्थेच्या शीर्षकाखाली आपणास पत्र आले. पुणे पोलिसांकडे हे पत्र देण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करत आहोत. पत्रानुसार नाशिक, जळगाव, भिवंडी, मुलूंड असा वेगवेगळा उल्लेख समोर येत असताना सरकारवाडा पोलिसांचे नावही यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा… जळगावात केळी पीकविम्यासाठी उत्पादक आक्रमक; न्यायालयात जाण्याची तयारी
पुणे पोलीस त्या अनुषंगाने कारवाई करत आहेत. या सर्व पार्श्वभूमिवर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात बाराशे कोटी मालमत्ता असलेला कारखाना असताना याकडे जर पालकमंत्री दादा भुसे यांचे दुर्लक्ष होत असेल तर किंवा त्यांनी दुर्लक्ष केले तर का केले, याविषयी भुसे यांना विचारले तर त्यांना राग येण्याचे कारण नाही, असे अंधारे यांनी सांगितले.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांचा यामध्ये सहभाग असल्याशिवाय अमली पदार्थ विक्री होऊ शकत नाही. त्यांची चौकशी करण्याची मागणी अंधारे यांनी केली.