भाविकांच्या वाहतुकीवरून एसटी-पोलीस यांच्यात मतभेद
जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यातील त्र्यंबकेश्वरच्या शुक्रवारी होणाऱ्या तिसऱ्या अर्थात अखेरच्या शाही पर्वणीत दुसऱ्या शाही पर्वणीप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याकडे लक्ष देण्यात येणार आहे. दुपारी बारापर्यंत त्र्यंबकमध्ये आखाडय़ांची वेळ असल्याने तोपर्यंत भाविकांना मंदिर व कुशावर्त खुले राहणार नाही. त्यामुळे नाशिकहून येणाऱ्या भाविकांनी दुपारी बारा वाजेनंतर त्र्यंबकमध्ये येण्याचे नियोजन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एसटी महामंडळाने त्यादृष्टीने बसगाडय़ा सोडाव्यात, असेही सूचित केले. तथापि, नाशिकमधील स्थानकांवर भाविकांना ताटकळत ठेवल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी महामंडळाला भीती आहे.
नाशिकची अखेरची पर्वणी शांततेत झाल्यानंतर प्रशासनाने त्र्यंबकची अंतिम पर्वणी त्याच पध्दतीने व्हावी, यासाठी जय्यत तयारी केली आहे. पहिल्या पर्वणीतील कडेकोट बंदोबस्तावरून आगपाखड झाल्यावर नियोजनात अनेक फेरबदल करण्यात आले. त्याची अंमलबजावणी दुसऱ्या पर्वणीत झाल्यामुळे भाविकांचा रोष काहिसा कमी झाला. त्यांची पायपीट कमी झाली. स्थानिकांना मिरवणूक पाहण्याची संधी मिळाली. अखेरच्या पर्वणीत दुसऱ्या पर्वणीप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. साधू-महंतांच्या स्नानासाठी कुशावर्त तीर्थ शुक्रवारी मध्यरात्रीपासून भाविकांसाठी बंद ठेवले जाईल. पहाटे चार वाजता मिरवणुकीला खंडेराव मंदिरापासून सुरूवात होईल. तेली गल्लीमार्गे कुशावर्त तीर्थात, स्नान झाल्यावर मुख्य रस्त्यामार्गे मंदिरात आणि नंतर आपापल्या आखाडय़ात साधू-महंत परततील. या दिवशी देशभरातून येणारी खासगी वाहने त्र्यंबकच्या हद्दीबाहेरील वाहनतळांवर रोखली जातील. तिथून भाविकांना त्र्यंबकमध्ये एसटी बसने नेण्यात येणार आहे. महामंडळाने तब्बल ७०० बसगाडय़ांचा ताफा सज्ज ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जवळपास सात हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. कुशावर्त तीर्थ, मिरवणूक मार्ग व इतर महत्वपूर्ण ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाईल.
बहुतांश नियोजन पूर्ण झाले असले तरी भाविकांची अकरा-बारानंतर नाशिकहून वाहतूक करावी, असे पोलिसांचे म्हणणे असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे निर्माण झालेल्या तिढय़ावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. पर्वणीच्या दिवशी महामार्ग, मेळा, निमाणी व गरज पडल्यास सातपूर येथून बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. भाविकांना सकाळपासून स्थानकावर थांबवून ठेवले तर ते संतप्त भावना व्यक्त करतील, अशी महामंडळाला साशंकता आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार पर्वणीच्या दिवशी दुपारी बारापर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्त भाविकांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी त्यानंतरच्या काळात त्र्यंबकमध्ये यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा