डॉ. एम. नीलिमा केरकट्टा यांची ग्वाही
खादी ग्राम उद्योगाच्या गुणवत्तात्मक उत्पादित वस्तूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ काम करणार आहे.
यामध्ये वस्तूंची विक्री झाली नाही तरी उत्पादकांना मालाचा खर्च ४५ दिवसात दिला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. नीलिमा केरकट्टा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील अनंत कान्हेरे मैदानावर मंडळाच्या वतीने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत मंगळवारपासून तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. केरकट्टा यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर केरकट्टा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत २०२१ पर्यंत प्रदर्शनासह विविध माध्यमातून खादी तसेच ग्रामोद्योगला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात अशा पध्दतीने प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये घरगुती वापराचे सामान, मसाले, खाद्य पदार्थ, अन्य काही वस्तु ज्यांचा दर्जा चांगला आहे त्या विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. प्लास्टिक विरहित असे पर्यावरणपूरक प्रदर्शन भरविण्याकडे मंडळाचा कल आहे. या प्रदर्शनासाठी केंद्र स्तरावरून दीड लाखाचा निधी मंजूर झाला. या निधीतून १० उद्योजकांना प्रेरित करा असे आवाहन करण्यात आले. अपुऱ्या निधीतून प्रदर्शन भरवित जिल्ह्य़ातील ३२ उद्योजकांना संधी दिल्याचे केरकट्टा यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील उद्योजकांना हक्काची तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळावी यासाठी मंडळ प्रयत्न करत आहे. गुणात्मक काम करणाऱ्या उद्योजकांना या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाईल. नाशिककरांनी खादी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन केरकट्टा यांनी केले आहे.
खादी प्रदर्शनातून खादीच गायब
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने अनंत कान्हेरे मैदानावर तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये घरगुती सामान, मसाले, उदबत्ती, सेंद्रिय गूळ, मध, पैठणी, अन्य महिला वस्त्र प्रावरणे आदी कक्ष असले तरी मंडळाची ओळख असलेले ‘खादी’ उत्पादन प्रदर्शनात नाही. तसेच ३२ उद्योजकांनी कक्ष उभारल्याचा दावा मंडळ करत असले तरी ३२ पैकी बोटावर मोजण्या इतक्या उद्योजकांचे प्रत्यक्षात कक्ष आहेत. नाशिक विभागात खादीची निर्मिती मंडळाकडून होत नाही. अमरावती, नांदेड आणि मुंबई येथून खादीचे उत्पादन मागविण्यात येणार होते. मात्र अमरावतीकडून खादी आणण्यास विलंब झाल्याने खादीचा कक्ष प्रदर्शनात नसल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे खादी महोत्स्वात खादी अभावानेच आढळून येत होती. अशाने खादीचा प्रसार कसा होणार असा प्रश्न ग्राहक विचारत होते.