लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात १०० दिवसांसाठी क्षयरोग जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत चार हजार ४११ नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. फिरत्या वाहनाच्या माध्यमातून संबंधितांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात येत आहेत

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते या मोहिमेचा सुरुवात झाली. या मोहिमेसाठी देशभरातून निवडलेल्या ३४७ जिल्ह्यात नाशिकचा समावेश आहे. क्षयरोग लवकरात लवकर ओळखून त्यावर उपचार होणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असून केंद्र सरकारच्या वतीने १०० दिवसांचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील दाट वस्ती असलेल्या भागांमध्ये जाऊन विशेष शोध मोहीम राबवण्यात येत आहे. रुग्ण किंवा संशयित रुग्णांचे समुपदेश करण्यात येत आहे.

आणखी वाचा-नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात

आरोग्य विभागातील आशा, आरोग्यसेवक, समाजातील अनेक संस्था यांनी सहभाग घेतला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून क्षयरुग्ण शोधत त्यांना उपचार सुरू करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, क्षयरुग्णांविषयी भेदभाव कमी करणे, तसेच या शंभर दिवसांमध्ये अती जोखमीचे म्हणून ६० वर्षावरील व्यक्ती, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती, धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती, यापूर्वी क्षयरोगाचा उपचार घेतलेल्या व्यक्ती, क्षयरुग्णांच्या संपर्कातील घरातल्या व्यक्ती, एचयव्हीबाधित व्यक्ती यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.

आणखी वाचा-नाशिकच्या ठकबाजाकडून नागपुरात गोशाळा उभारण्यासाठी तीन कोटी

जिल्ह्यात आदिवासीबहुल, वीभट्टी, कारखाना परिसर आदी ठिकाणी ही विशेष मोहीम राबवली जात आहे. यासाठी फिरत्या वाहनांच्या माध्यमातून क्षयरोगसदृश्य अथवा काही लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आवश्यक डिजिटल उपकरणे आहेत. यामुळे रोगाचे निदान करणे सहज शक्य होत आहे. आतापर्यंत चार हजार १११ नागरिकांपर्यंत पोहचण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षयमित्र यांच्याकडून पोषण आहार संचाचे वाटप करण्यात येत आहे.

Story img Loader